Pune koyta Gang news : विद्येचे माहेर घर आणि राज्याचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या पुण्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. पुणे पोलिसांनी तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स पकडत जप्त केले होते. दरम्यान, ही कारवाई ताजी असतांनाच पुण्यात कोयता गँगच्या टोळक्यांनी उच्छाद मांडला असल्याचे पुढे आले आहे. बुधवारी रात्री खडकवासला येथील गोहे बुद्रुक येथे १० जणांच्या टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील पुढे आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत कायम आहे. तरुणांची काही टोळके हातात कोयते घेऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवत असून अद्याप त्यांच्यावर नियंत्रण बसवण्यात पुणे पोलिसांना यश आलेले नाही. बुधवारी रात्री खडकवासला परिससारतील गोहे बुद्रुक येथे १० ते १२ तरुण हातात कोयते घेऊन थांबले होते. या वेळी रस्त्यावरून दुचाकीवरून तिघे तरुण येताच या टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. १० ते १२ जणांनी मिळून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात तिघे जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
भररस्त्यात करण्यात आलेल्या या हल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पुण्यात गुंडांना कायद्याचा धाक उरला नाही का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या टोळक्याने धावत येत दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे दृश्य हादरवून टाकणारं आहे.
दरम्यान, पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी काही पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांची परेड घेतली होती. तसेच त्यांना तंबी देखील दिली होती. मात्र, असे असतांनाही पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सुरूच आहे. येरवडा येथे देखील काही तरुणांनी हातात कोयते घेऊन काही गाड्यांची तोडफोड केली होती. यानंतर गोहे बुद्रुक येथे झालेल्या या हल्ल्यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.