गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला IPL २०२४ चा चॅम्पियन बनवले आहे. यानंतर आता गुरू गंभीरची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता नक्कीच वाढली आहे. बीसीसीआयच्या यादीत गंभीर अव्वल स्थानावर असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत.
पण रविवारी (२६ मे) झालेल्या फायनलनंतर या चर्चा आणखी वाढल्या आहेत. गंभीरही या पदासाठी इच्छुक आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. पण गंभीरने अद्याप अर्ज केलेला नाही.
आता अशातच एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे, की केकेआरचा मालक शाहरुख खान याने गंभीरला ब्लँक चेक देऊन केकेआरमध्येच राहण्याची ऑफर दिली आहे. दैनिक जागरण या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, गंभीर टीम इंडियाच्या हेड कोचपदासाठी तयार आहे. पण त्याला या निर्णयात पुढे जाण्यासाठी केकेआरचा मालक शाहरुख खानशी चर्चा करावी लागेल. कारण गंभीरने केकेआरमध्येच राहावे, असे शाहरुखची इच्छा आहे.
तसेच, त्याच वृत्तपत्राचा हवाला देत असाही दावा केला जात आहे, की शाहरुखने IPL २०२४ पूर्वीच गंभीरची भेट घेतली होती. आणि त्याने गंभीरला १० वर्षांसाठी केकेआरचे मॅनेजमेंट सांभाळण्यासाठी ब्लॅंक चेक देऊ केला होता. याआधी गंभीरने लखनऊमध्ये दोन सीझनसाठी मेंटर म्हणून काम केले होते. आणि या काळात लखनौची कामगिरीही अप्रतिम होती. ते सलग दोन हंगाम प्ले-ऑफसाठी पात्र ठरले होते.
याशिवाय केकेआरने गौतम गंभीरच्याच नेतृत्वाखाली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. केकेआरचा कर्णधार म्हणून त्याने हे काम दोनदा केले. आणि मग आता मार्गदर्शक म्हणून येताच गंभीरने चमत्कार करून दाखवला. या हंगामात केकेआर पूर्णपणे वेगळा संघ दिसला. लीगदरम्यान त्यांनी कोणत्याही संघाला आपल्यापुढे उभे राहू दिले नाही. गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरला. त्यानंतर प्ले-ऑफमध्ये हैदराबादचा सहज पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. आणि नंतर त्याच हैदराबादला अंतिम फेरीत पराभूत करून चॅम्पियन बनले.
कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो फारसा प्रभावी ठरला नाही. हैदराबादचा डाव ११३ धावांत आटोपला. KKR ने हे लक्ष्य ८ विकेट्स आणि ५७ चेंडू बाकी असताना पार केले.
केकेआरकडून सुनील नरेनने या मोसमात दमदार कामगिरी केली. त्याने १५ सामन्यात ४८८ धावा केल्या आणि १९ विकेट घेतल्या. त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. नरेनसह फिलिप सॉल्टनेही चांगली कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४३५ धावा केल्या. सॉल्टने ४ अर्धशतके झळकावली.
संबंधित बातम्या