मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Final : बीसीसीआयने ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी खजिना खुला केला, लाखोंची बक्षिसं मिळणार

IPL 2024 Final : बीसीसीआयने ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी खजिना खुला केला, लाखोंची बक्षिसं मिळणार

May 27, 2024 05:05 PM IST

KKR vs SRH Final IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल २०२४ चा विजेता संघ म्हणून २० कोटी रुपये मिळाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडू तसेच ग्राऊंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी खजिना खुला केला आहे.

बीसीसीआयने ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी खजिना खुला केला, लाखोंची बक्षिसं मिळणार
बीसीसीआयने ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी खजिना खुला केला, लाखोंची बक्षिसं मिळणार

jay shah announced 25 lakhs for groundsman : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाची ट्रॉफी जिंकली आहे. केकेआरने अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा पराक्रम केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने यंदा अप्रतिम कामगिरी केली. या मोसमात केकेआर समोर जो कोणता संघ आला त्याला चिरडत त्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल २०२४ चा विजेता संघ म्हणून २० कोटी रुपये मिळाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडू तसेच ग्राऊंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी खजिना खुला केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ग्राउंड स्टाफला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आयपीएलमधील १० मैदानांवरील कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्यात येईल. तसेच, तीन अतिरिक्त मैदानांवरील कर्मचाऱ्यांनाही मोठी रक्कम मिळणार आहे.

खरंतर जय शाह यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी मोठी घोषणा केली. जय शाह यांनी X वर लिहिले, “आमच्या यशस्वी T20 हंगामात (IPL 2024) अनसंग हिरोज ग्राउंड स्टाफचे महत्त्वाचे योगदान आहे. खराब हवामानातही त्यांनी चांगली खेळपट्टी चांगली ठेवली. १० नियमित आयपीएल मैदानांच्या ग्राउंड्समन आणि क्युरेटर्स यांच्या स्टाफला प्रत्येकी २५ लाख रुपये मिळतील. तर ३ अतिरिक्त मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या स्टाफला प्रत्येकी १० लाख रुपये मिळतील तुमच्या समर्पण आणि मेहनतीबद्दल धन्यवाद!

आयपीएल संघांच्या बक्षीस रकमेबद्दल बोलायचे झाले तर खेळाडूंना करोडो रुपये मिळाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला २० कोटी रुपये मिळाले आहेत. तर सनरायझर्स हैदराबादला १२.५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

तर राजस्थान रॉयल्सला ७ कोटी रुपये मिळतील. राजस्थानला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६.५ कोटी रुपये मिळणार आहेत. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

विशेष म्हणजे केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. या संघाने २०१२ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तो जिंकला. आता संघ १० वर्षानंतर २०२४ मध्ये चॅम्पियन बनला आहे.

केकेआरकडून सुनील नरेनने या मोसमात दमदार कामगिरी केली. त्याने १५ सामन्यात ४८८ धावा केल्या आणि १९ विकेट घेतल्या. त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. नरेनसह फिलिप सॉल्टनेही चांगली कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४३५ धावा केल्या. सॉल्टने ४ अर्धशतके झळकावली.

टी-२० वर्ल्डकप २०२४