Pune Porsche Car Accident : पुण्यात १९ मे रोजी बिल्डर विशाल अगरवालच्या मुलाने भरधाव वेगात आलीशान पोर्शे कार चालवत दोघांना उडवले होते. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मोठे आरोप झाल्यावर आरोपी मुलाला बाल न्याय मंडळात पाठवण्यात आले होते. दरम्यान शनिवारी मुलाच्या आईला अटक करण्यात आली असून मुलाच्या आईची आणि आरोपी मुलाची तब्बल दोन तास पोलिसांनी चौकशी केली. यावेळी आरोपी मुलाने मी मद्यधुंद अवस्थेत असल्याने मला काही आठवत नाही असे म्हणून तपास पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची पालकांसमोर चौकशी करण्यास बाल न्याय मंडळाने पोलिसांना शनिवारी मंजूरी दिली होती. त्यानुसार या प्रकरणी अल्पवयीन मुलाची शनिवारी येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल २ तास चौकशी केली. या चौकशीच्या वेळी मुलाची आई शिवानी अगरवाल व बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. यावेळी आई व आरोपी मुलगा या दोघांनी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. दोघांनीही पोलिस तपासात असहकार केला.
पुणे पोलिसांनी चौकशी दरम्यान, कार कोण चालवत होतं? ब्लॅक आणि कोझी पबमध्ये त्याच्या सोबत कोण उपस्थित होते, तसेच ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. तेव्हा कोण उपस्थित होते, याची माहिती पोलिसांनी घेतली. मात्र, पोलिसांच्या प्रश्नांना दोघांही ही नीट उत्तरे दिली नाहीत.
गुन्हे शाखेच्या पथकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही दोघांनीही दिली नाहीत. दोन तास झालेल्या या चौकशीत अपघात झाला त्या वेळी मोटारीत कोण होते? मोटार कोण चालवत होते? अपघात नेमका कसा झाला? यासह अनेक प्रश्न पोलिसांनी मुलाला विचारले. मात्र, मी मद्यधुंद असल्याने मला ‘नेमके आठवत नाही’, ‘लक्षात येत नाही’, अशी उडवा उडवीची उत्तरे मुलाने पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चौकशी करण्यात आली.
या बाबत गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या अधिकाऱ्यांनी अपघातापूर्वी अल्पवयीन मुलाचे लोकेशन, ब्लॅक आणि कोसी पबमध्ये त्याची उपस्थिती, पोर्श चालविणे, अपघाताचा तपशील, पुराव्यांशी छेडछाड, रक्ताचे नमुने गोळा करणे आणि वैद्यकीय चाचण्यांबद्दल विचारणा केली. या सर्व प्रश्नांचे उत्तर अल्पवयीन मुलाकडे एकच होते - तो मद्यधुंद असल्याने त्याला कशाचीही आठवण नव्हती," अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या मित्रांनी दोन पबमध्ये मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून तेथे त्यांचे एकूण ४८ हजार रुपयांचे बिल होते.
संबंधित बातम्या