Malegaon Corporator Attack : मालेगाव येथे गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांना आणखी एक नगरसेवक आणि त्याच्या मुलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री ही घटना मालेगावच्या हजार खोली परिसरातील मदिना चौकात घडली असून यात माजी नगरसेवक अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेत अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताची बोटे कापली गेली आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजीज लल्लू व त्यांच्या मुलगा हे नमाज पठण करून शनिवारी रात्री घरी जात होते. यावेळी ते हजारखोली भागातील मदिना चौक येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्ले खोरांनी या दोघांवर तलवारीने वार केले. अजिज लल्लू यांच्या डोक्यावर हातावर तलवारीने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताची बोटे देखील कापली गेली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ही गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला जमिनीच्या वादातून झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मदिना चौकात मोटारसायकलवरुन आलेल्या दोन ते चार जणांनी अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर हल्ला केला. अझीझ लल्लू यांचा त्यांच्या नातेवाईकांशी जमिनीवरुन वाद सुरु आहे. यातूनच हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या आठवड्यातच मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर आता पुन्हा ही घटना घडल्याने मालेगाव पुन्हा हादरले आहे. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. यामुळे तणाव निवळला.