आयपीएल २०२४ चा अंतिम सामना २६ मे रोजी खेळला गेला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल फायनलमध्ये कोलकाताने हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला.
या सामन्यात कोलकात्याच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात आपला दबदबा कायम राखला. चॅम्पियन झाल्यानंतर ट्रॉफी कर्णधार श्रेयस अय्यरकडे सुपूर्द करण्यात आली आणि त्याने संपूर्ण संघासह या खास क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला.
दरम्यान, या सेलिब्रेशनमधील शाहरुख खानचा फ्लाइंग किस देतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये किंग खान हर्षित राणाच्या फ्लाइंग किस स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसत आहे. शाहरुख खानने संपूर्ण टीमसोबत फ्लाइंग किस सेलिब्रेशन केले.
शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स स्टेजवर आयपीएल २०२४ ट्रॉफीसह साजरा करत होता. अशा परिस्थितीत, किंग खान, गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांव्यतिरिक्त, जुही चावला आणि तिचा पती जय मेहता देखील संपूर्ण केकेआर टीमसोबत फ्लाइंग किस पोज देताना दिसले. ही पोज दिल्यानंतर कोलकाता टीमच्या संपूर्ण स्टाफला हसू आवरता आले नाही आणि सगळे खूप हसले.
केकेआरच्या संपूर्ण संघाने ट्रॉफीसोबत दिलेली फ्लाइंग किस पोज टीमचा वेगवान गोलंदाज हर्षित राणामुळे व्हायरल झाली होती. वास्तविक, हा प्रसंग सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये घडला होता. केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील साखळी टप्प्यातील सामन्यात हर्षित राणाने हैदराबादच्या मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर फ्लाइंग किस दिला होता.
यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हर्षितने केलेले हावभाव खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे सांगितले आणि त्याला दंड ठोठावला होता. पण आता शाहरूखने याच फ्लाइंग किस स्टाइलमध्ये सेलिब्रेशन करून आपला आपल्या प्रत्येक खेळाडूला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.
केकेआरने ट्रॉफी जिंकल्याचा आनंद शाहरुख खानच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या दरम्यान, त्याने पत्नी गौरी खानला मिठी मारण्यापूर्वी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्याने मुलगी सुहाना खान आणि लहान मुलगा अबराम खानलाही मिठी मारली. किंग खानला गौतम गंभीरवर प्रचंड विश्वास आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता चॅम्पियन झाला आणि शाहरुखने त्याच्या कपाळाचेही चुंबन घेतले.
संबंधित बातम्या