Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. आज देखील राज्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला असून यामुळे ढगाळ हवामान राहून अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, नागपूर, वर्धा, गोंदिया, अमरावती या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामाची विशेष यंत्रणा नाही. असे असले तरी एक पश्चिमी विक्षोभ कायम असून याचा परिमाण पश्चिम हिमालयावर होणार आहे. हा विक्षोभ आज ६२ डिग्री पूर्व रेखांश आणि ३२ डिग्री उत्तर अक्षांशावर आहे. परिणामी एक द्रोणीका रेषा दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भावर सक्रिय राहणार आहे. त्यामुळे विदर्भात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
१० मार्च नंतर आणखी एक पश्चिमी विक्षोभ हिमालयावर सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. पुढील ७२ तासांत एक ते दोन डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. १० मार्च नंतर किमान आणि कमाल तापमानात हळू हळू वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. पुढील ७२ तासात दीड ते दोन डिग्री सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात हळू हळू वाढ होण्याची शक्यता आहे.
देशात देखील दिल्ली, ऊतर प्रदेश, हिमाचल प्रादेशांत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. या राज्यात तापमानात मोठा बदल झालेला आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीमुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. काश्मीर खोऱ्यासह पर्वतीय भागात पाऊस पडत आहे. ज्यामुळे उत्तर भारतात तापमानात घट झाली आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी कमी तापमानाची सकाळी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेश, बिहार व उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.