Internation Womens day : देशात कर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. इतकंच नव्हे तर कर्जाचे हप्ते वेळेवर फेडण्यात महिलांनी पुरुषांना मागं टाकलं आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची ईएमआय वेळेवर भरण्याची शक्यता १० टक्के अधिक असते, असं समोर आलं आहे.
फिनटेक प्लॅटफॉर्म Fibe नं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हे सर्वेक्षण केलं. महिला जेव्हा कर्ज घेतात, तेव्हा ते अधिक जबाबदारीने फेडतात. यातून त्यांचा प्रामाणिक दृष्टिकोन आणि सारासार विचार करून निर्णय घेण्याची सवय दिसून येते. ही सवय महिलांच्या उत्तम आर्थिक व्यवस्थापनाची निदर्शक आहे.
गेल्या पाच वर्षांत महिला ग्राहकांकडून कर्जाची मागणी दुपटीनं वाढली आहे. २०१९ मध्ये हे प्रमाण १८ टक्के होतं. ते २०२३ मध्ये ४० टक्के झालं आहे. त्याच वेळी, पुरुषांच्या कर्ज घेण्याच्या प्रकरणांमध्ये २२ टक्के घट नोंदवली गेली. पुरुषांकडून कर्जाच्या मागणीचं प्रमाण २०१९ साली ८२ टक्के होतं, ते २०२३ मध्ये ६० टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे.
सर्व महिला कर्जदारांमध्ये प्रथमच कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा वाटा जवळपास ३२ टक्के आहे. ज्या महिलांकडं क्रेडिट कार्ड आहेत. त्या नियमितपणे कर्ज घेत असल्याचं दिसून आलंय. त्यांची संख्या १३ टक्के आहे. ज्यांच्याकडं क्रेडिट कार्ड नाही, त्या महिला इतर प्रकारचं कर्ज घेतात. त्यांची संख्या १८ टक्के आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत नेतृत्वाच्या पदांवर महिलांचं प्रतिनिधित्व वाढल्याचं आणखी एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. शिक्षण-तंत्रज्ञान स्टार्टअप हीरो वायर्डनं हे सर्वेक्षण केलं आहे. त्यात दोन लाख महिलांची मतं घेण्यात आली आहेत. यामध्ये महिलांच्या विविध भूमिकांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले.
नोकरी व रोजगारामध्ये महिलांना आजच्या कर्मचाऱ्यांमध्ये पुरुषांप्रमाणे समान संधी आहेत, असं मत ५९ टक्के महिलांनी व्यक्त केलं आहे. नेतृत्व पदांवर महिला असल्यामुळं फायदा होत असल्याचं मत ७८ टक्के लोकांनी नोंदवलं आहे. त्यामुळं कार्य संस्कृतीत विविधता आणि सर्वसमावेषकतेला वाव मिळतो.