USA vs CAN : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस, अमेरिकन संघाने केले हे मोठे विक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  USA vs CAN : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस, अमेरिकन संघाने केले हे मोठे विक्रम

USA vs CAN : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस, अमेरिकन संघाने केले हे मोठे विक्रम

Jun 02, 2024 12:58 PM IST

T20 World Cup 2024, Aaron Jones : अमेरिकेसमोर १९५ धावांचे मोठे लक्ष्य होते, पण २९ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज ॲरॉन जोन्सच्या झंझावाती ९४ धावांच्या खेळीसमोर ही धावसंख्या छोटी ठरली. जोन्सने आपल्या स्फोटक खेळीने एकापाठोपाठ एक अनेक विक्रम मोडीत काढले.

USA vs Canada Match : टी-20  वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस, अमेरिकन संघाने केले हे मोठे विक्रम
USA vs Canada Match : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस, अमेरिकन संघाने केले हे मोठे विक्रम (AP)

T20 World Cup 2024, USA vs Canada Match : टी-20 विश्वचषक २०२४ ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात (२ जून) यजमान यूएसएने कॅनडाचा १४ चेंडू आणि ७ गडी राखून पराभव केला.

अमेरिकेसमोर १९५ धावांचे मोठे लक्ष्य होते, पण २९ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज ॲरॉन जोन्सच्या झंझावाती ९४ धावांच्या खेळीसमोर ही धावसंख्या छोटी ठरली. जोन्सने आपल्या स्फोटक खेळीने एकापाठोपाठ एक अनेक विक्रम मोडीत काढले.

ॲरॉन जोन्सने अवघ्या ४० चेंडूत १० गगनचुंबी षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने कॅनडाच्या गोलंदाजांची दैना उडवली. T20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा रनचेस आहे. या सामन्यातील विक्रमांवर एक नजर टाकूया.

अमेरिकेसाठी सर्वात मोठी भागिदारी

या सामन्यात ॲरॉन जोन्सने ४० चेंडूत ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या. यादरम्यान त्याने अँड्रिस गॉससोबत तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. T-20 क्रिकेटमध्ये अमेरिकेसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा हा विक्रम आहे. गॉसने ४६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या.

T20 WC मधील तिसरे सर्वात मोठे रनचेस

कॅनडाच्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना USA ने दमदार फलंदाजी केली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात मोठे रनचेस आहे. याआधी २०१६ च्या विश्वचषकात इंग्लंडने वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी जोबर्ग येथे वेस्ट इंडिजचे २०६ धावांचे लक्ष्य पार केले होते.

ॲरॉन जोन्सने केली ख्रिस गेलची बरोबरी

ॲरॉन जोन्सने या सामन्यात १० षटकार मारून कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेलची बरोबरी केली. २००७ टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावांच्या खेळीत १० षटकार मारले होते. तथापि, टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक ११ षटकार मारण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे, जो त्याने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता.

T20 WC मधील सर्वात महागडं षटक

कॅनडाच्या जेरेमी गॉर्डनने सामन्याच्या १४व्या षटकात ३२ धावा दिल्या. या षटकात त्याने एकूण ११ चेंडू टाकले, ज्यात ३ षटकार, २ चौकार, ३ वाइड आणि २ नो बॉल होते.

अशाप्रकारे जेरेमीने टी-२० विश्वचषकातील दुसरे सर्वात महागडे षटक टाकले. स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या क्रमांकावर कायम आहे, त्याने ६ चेंडूंत ३६ धावा दिल्या होत्या.

ॲरॉन जोन्स सहयोगी संघाचा पहिला फलंदाज

आजपर्यंत टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात सहयोगी संघातील एकाही फलंदाजाने १० षटकार मारले नाहीत. ही कामगिरी करणारा ॲरॉन जोन्स पहिला फलंदाज ठरला. इतकंच नाही तर जोन्स अमेरिकेसाठी टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

Whats_app_banner