उन्हाळा असो किंवा हिवाळा केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. काळजी न घेतल्यास केस गळू लागतात आणि कमकुवत होतात.
मुलं असोत किंवा मुली, ते अनेकदा केसांवर कंगवा फिरवत असतात. तुम्हाला माहित आहे का जास्त वेळा कंगव्याने केस विंचरल्याने नुकसानही होऊ शकते.
केसांना कंगव्याने किती वेळा विंचरावे आणि कसे विंचरावे, याचे फायदे-तोटे काय आहेत, ते जाणून घेऊया...
वारंवार फणीने केस विंचरल्याने केस कमकुवत होतात आणि ते गळू लागतात. कंगव्याचे तीक्ष्ण दात टाळूला कमकुवत करतात.
सतत कंगवा वापरल्याने डोक्यातील त्वचेला इजा होते आणि मग कोंड्याची समस्या सुरू होते.
वारंवार कंगवा फिरवल्याने केसांच्या क्युटिकल्सचेही नुकसान होते. हेअर क्युटिकल्स केसांचे संरक्षण करतात. जेव्हा ते कमकुवत होतात, तेव्हा केस तुटू लागतात.
मात्र, कंगव्याने केस विंचरण्याचे काही फायदे देखील आहेत. केसांना चांगल्या कंगव्याने विंचरल्याने रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत होते.
कंगवा वापरून केस विंचरल्याने केसांमधील नैसर्गिक तेल वाढते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
दिवसातून दोनदाच केस विंचरावे. यापेक्षा जास्त वेळा विंचरणे टाळा. अगदीच जास्तीत जास्त तुम्ही तीन वेळा केस विंचरू शकता. मात्र, त्यापेक्षा जास्त विंचरल्यास केस तुटू शकतात.
जर, तुमचे केस लांब असतील तर कंगव्याने केस विंचरल्यावर केस बांधून ठेवा. उघडे ठेवल्यास केस गुंततात. पुरुषांचे केस लहान असल्याने त्यांना ही समस्या नसते.