धनंजय दातार
(व्यवस्थापकीय संचालक, अदिल ग्रूप)
कोणताही व्यवसाय सुरु करताना तो एकट्याने (Proprietorship), भागीदारीत (Partnership) किंवा सामूहिक (Co-operative) पद्धतीने करता येतो. या प्रत्येक पद्धतीचे स्वतंत्र फायदे-तोटे आहेत. एकट्याने व्यवसाय करताना सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीच्या खांद्यावर पडते. धंद्याच्या यशापयशाला केवळ मालक जबाबदार असतो. त्याला स्वतःचा पैसा ओतावा लागतो. अतिरिक्त भांडवल उभारणीवर मर्यादा येतात. निर्णय एकट्याने घ्यावे लागतात. एकाअर्थी ती ‘वन मॅन आर्मी’ ठरते.
भागीदारी व्यवसायात मदतीला एक किंवा अधिक सहकारी लाभतात. जबाबदाऱ्यांची विभागणी होते आणि भांडवलही निम्मेच घालावे लागते. भागीदारांकडे वेगवेगळे कौशल्यसंच असतील तर त्याचाही फायदा होतो. पण या भागीदारीत मतभेद किंवा स्वार्थ आल्यास धंद्याची वाट लागते.
अनेक लोकांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर उद्योग स्थापन करता येतो. यात प्रत्येकाचा भांडवली वाटा कमी असतो आणि जबाबदाऱ्या सांभाळायला खूप माणसे मिळतात. नफा वाटून घ्यावा लागला तरी असा व्यवसाय टिकाऊ असते हेही खरेच. पण इथेही मतभेद किंवा गटबाजी झाल्यास उद्योगाचा मूळ हेतू बाजूला राहून कुरघोडीचे राजकारण सुरु होते. एकीकडे ‘विना सहकार, नाही उद्धार’ म्हणताना अखेर ‘तीन तिगाड काम बिघाड’ ही म्हण खरी ठरण्याची वेळ येते.
मला व्यक्तीशः भागीदारी किंवा सामूहिक व्यवसायाची कल्पना फारशी रुचत नाही, कारण भागीदारीचा अत्यंत कटू अनुभव आम्हाला सुरवातीलाच आला. व्यवसायाची घडी बसल्यानंतर तो वाढवण्याचा विचार बाबांच्या मनात आला. पण त्यासाठी भांडवल कमी पडत असल्याने ते भागीदाराच्या शोधात होते. त्यांचा भागीदारीचा प्रस्तावही आकर्षक होता. म्हणजे भागीदाराने केवळ भांडवल पुरवायचे, दुकान बाबांनी चालवायचे आणि होणारा नफा दोघांनी निम्मा-निम्मा वाटून घ्यायचा.
या प्रस्तावाला एका धनाढ्य व्यापाऱ्याने प्रतिसाद दिला. बाबांनी त्याच्याशी भागीदारी करार करुन दुकानाचा विस्तार केला. पुढे त्या भागीदाराच्या मनात लोभ निर्माण झाला. तो धंद्यात मुरलेला आणि माझे बाबा नवशिके. दुकान फायद्यात चालत असल्याचे बघून त्याने धंदा बळकवण्याचा बेत आखला. बाबांनी स्वतःची सगळी पुंजी दुकानात गुंतवल्याचे त्याला ठाऊक होते. त्याने धूर्तपणाने एक डाव टाकला. दुकान बाबांनी सांभाळायचे व भागीदाराने सायलेंट पार्टनर राहायचे, हे करारातील कलम डावलून तो दुकानाच्या कामात हस्तक्षेप करु लागला. ते बाबांना पटले नाही परिणामी त्यांच्यात मतभेद झाले. त्या साळसूद व्यापाऱ्याने बाबांना खिंडीत गाठले. ‘भागीदारी तत्काळ संपवायची असेल तर माझे भांडवल एकरकमी परत करा, किंवा दुकान मला विकून त्यातून स्वतःचे भांडवल काढून घ्या,’ असे त्याने बजावले.
आपण घाम गाळून रोपाचे झाड करायचे आणि त्याला फळे लागल्यावर आगंतुकाने हक्क सांगायचा, हे बाबांना पसंत नव्हते. हातात पैसे नसतानाही त्यांनी पुन्हा एकदा धाडसाने मिळेल तेथून कर्ज, उधार-उसनवाऱ्या घेऊन रक्कम उभारली आणि भागीदारीची कटकट एकदाची संपवून टाकली. बाबांच्या मनस्तापातून धडा घेऊन मीही तेव्हापासून कानाला खडा लावला आणि व्यवसाय एकट्याने केला.
भागीदारांच्या आपसांतील डावपेचांमुळे चांगला उद्योग कसा मातीमोल होतो, याचे उदाहरण मी बघितले आहे. दोन भागीदारांनी मेहनतीने व एकमताने चालून व्यवसाय चांगला नावारुपाला आणला होता. नफा वाढला, सुबत्ता आली, कंपनीतील कर्मचारीवर्गही वाढवण्याची गरज भासू लागली. नेमकी इथेच स्वार्थाची ठिणगी पडली. एका भागीदाराने पत्नीच्या आग्रहामुळे आपल्या मेव्हण्याला कंपनीत कामाला लावून घेतले. हळूहळू मेव्हणोबांनी कमाल दाखवायला सुरवात केली. त्याने कर्मचारी वर्गात फूट पाडून काहींना आपल्या बाजूला वळवून घेतले. त्याला कंपनीची सूत्रे आपल्या बहिणीच्या नवऱ्याकडे असायला हवी होती. या प्रकाराची पहिल्या भागीदाराला काहीच कल्पना नव्हती. एकदा कर्मचाऱ्यांतील भांडण फार चव्हाट्यावर आल्याने सगळ्याचा उलगडा झाला. परिणामी दोघा भागीदारांत जोराचे भांडण झाले. कंपनीत इतके हेवेदावे सुरु झाले, की अखेर दोघांनी ती कंपनी तिसऱ्याला विकून टाकली. ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’, ही म्हण खरी ठरली. संधी मिळताच कर्मचारीही भागीदारांत भांडणे लावण्यास कमी करत नाहीत. म्हणून भागीदारांनी हलक्या कानाचे राहू नये व चहाडखोरीला उत्तेजन देऊ नये.
मित्रांनो, उंटाला तंबूत शिरु दिले तर नंतर मालकाला बाहेर झोपण्याची वेळ येते, हे एका अरबी नीतिकथेचे तात्पर्य आहे. म्हणूनच ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही म्हण भागीदारी करण्यापूर्वी लक्षात ठेवावी.