Vijay Shivtare Ajit Pawar meeting : बारामती लोकसभा मतदार संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. पुरंदर तालुक्याचे माजी आमदार तसेच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार विरोधी भूमिका घेत त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. गेल्या १० ते १२ दिवसांनपासून त्यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत, पवार कुटुंबियांविरोधात मोठा मोर्चा उघडला होता. या १० दिवसांत त्यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका देखील केली होती. यावर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना निर्वाणीचा इशारा देखील दिला होता. अखेर विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. दोन्ही नेत्यात तोडगा निघणार का? शिवतारे खरच बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेणार का? हे या पत्रकार परिषदेत स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असल्याची माहिती आहे. या चर्चेद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याची माहिती आहे. यामुळे विजय शिवतारे आज बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणार आहेत. दरम्यान, या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हे देखील उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदार संघात राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे निवडणूक लढणार आहेत. तर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, पवार घराण्यावर जुना राग असल्याने या रागाचा वचपा काढण्यासाठी शिवतारे यांनी पवार यांच्या विरोधात दंड थोपटत लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा देखील केली होती. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. कोणत्याही परिस्थितीत मी बारामती निवडणूक लढवणारचं असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याने यात सकारात्मक तोडगा निघाल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या