मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR VS RCB : प्लेऑफमध्ये राजस्थान आणि आरसीबी तिसऱ्यांदा भिडणार, याआधीचा इतिहास काय? जाणून घ्या

RR VS RCB : प्लेऑफमध्ये राजस्थान आणि आरसीबी तिसऱ्यांदा भिडणार, याआधीचा इतिहास काय? जाणून घ्या

May 20, 2024 08:41 PM IST

RR VS RCB IPL 2024 PLAYOFFS: रविवारी गुवाहाटीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले

RR VS RCB IPL 2024 PLAYOFFS प्लेऑफमध्ये राजस्थान आणि आरसीबी तिसऱ्यांदा भिडणार, याआधीचा इतिहास काय? जाणून घ्या
RR VS RCB IPL 2024 PLAYOFFS प्लेऑफमध्ये राजस्थान आणि आरसीबी तिसऱ्यांदा भिडणार, याआधीचा इतिहास काय? जाणून घ्या (AP)

आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. हा सामना २२ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल २०२४ मध्ये पॉइंट टेबलमध्ये बहुतेक वेळा अव्वल स्थानावर राहिला, परंतु शेवटच्या क्षणी त्यांची लय बिघडली आणि लीग टप्प्याच्या शेवटी ते तिसरे स्थानावर घसरले.

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, रविवारी गुवाहाटीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. केकेआरने पहिले स्थान मिळवले होते तर रॉयल्सला दुसरे स्थान मिळवण्यासाठी विजय आवश्यक होता. पण पावसाने रॉयल्सच्या आशा धुळीस मिळवल्या आणि त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

राजस्थान-बंगळुरू प्लेऑफमध्ये दोनदा भिडले

आता एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. जो संघ विजयी होईल तो दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल. आयपीएलच्या इतिहासात याआधी प्लेऑफमध्ये हे दोन संघ कधी आमनेसामने आले होते ते जाणून घेऊया.

राजस्थान वि. आरसीबी प्लेऑफ इतिहास

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात दोनदा सामना झाला आहे. दोन्ही संघांनी एकमेकांना एकदा पराभूत केले आहे. २०१५ मध्ये पहिल्यांदा RCB आणि RR एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी आरसीबीने राजस्थानचा ७१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १८० धावा केल्या होत्या. एबी डिव्हिलियर्स आणि मनदीप सिंग यांनी अर्धशतके झळकावली होती. त्यानंतर हर्षल पटेल, श्रीनाथ अरविंद, डेव्हिड वीसा आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेत राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले. आरसीबीने आरआरला १०९ धावांत ऑलआउट केले.

रॉयल्सने दोन वर्षांपूर्वी बदला घेतला

यानंतर आयपीएल २०२२ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबी आणि राजस्थान यांच्यात सामना झाला. बेंगळुरूने एलिमिनेटर सामन्यात लखनौचा पराभव करून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला होता, तर पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल्सला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला.

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. रजत पाटीदारने अर्धशतक झळकावले. पण जोस बटलरने शतक झळकावून आरसीबीच्या आशा मोडीत काढल्या आणि रॉयल्सला ७ विकेट्सने सहज विजय मिळवून दिला.

रोमांचक सामन्याची अपेक्षा

यानंतर आता राजस्थान आणि आरसीबी तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये भिडणार आहेत. आकडेवारी पाहता आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ आहे तर रॉयल्स दुसरा संघ आहे. आरसीबी आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४