Mumbai, Pune Weather Update : राज्यात सूर्य आग ओकत आहे. मध्य महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात देखील गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात तापमात वाढ झाली आहे. पुण्यात तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास पोहचले आहे. कमाल तापमानासोबत किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील आद्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दमट व उष्ण वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
पुण्यात मंगळवारी २०.५ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आले. तर मुंबईत ३१.४, सांताक्रूज ३२.०, अलिबाग ३१.६, रत्नागिरी ३२.२, पणजी ३३.२ तर डहाणू येथे ३३.३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अकोल्यात सर्वाधिक ४२ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबईत दिवसा कोरडं वातावरण पाहायला मिळत असून तापमानात हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत मुंबईतील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात देखील तापमानात वाढ झाली आहे. काही वर्षापूर्वी पुण्यातील उन्हाळा हा आल्हादायक असायचा. मात्र, पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. पुण्यात कमाल तापमान ३९ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान २०.८ डिग्री सेल्सिअस एवढे झाले आहे. पुण्यात पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता पुणे वेश शाळेने वर्तवली आहे. तर ३० आणि १ तारखेला आकाश निरभ्र तर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ३१ तारखेला आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात बुधवारी ३९ डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर, २०.५ एवढे किमान तापमान होते.
मुंबई पुण्यात एप्रिल, मे महिन्यात उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.