शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून महाविकास आघाडीत धूसफूस पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात यांनी ठाकरेंना आवाहन केले आहे की, त्यांनीदक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारीबाबत फेरविचार करावा.
दरम्यान खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व आमदार वर्षा गायकवाड लोकसभा लढण्यास इच्छूक आहेत. ठाकरे यांनी अनिल देसाई यांची उमेदवारी मागे न घेतल्यास वर्षा गायकवाड येथे ठाकरेंविरोधात उभ्या राहू शकतात. त्याचबरोबर असेलही म्हटले जाऊ शकते की, येथे ठाकरे गट व काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते.
महाविकास आघाडीमध्ये सांगली व दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील तर मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून शिवसेनेने पुन्हा फेरविचार करावा अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
महाविकास आघाडीत जागावाटप अध्याप फायनल झाले नसताना तसेच कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. सांगलीच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तसेच,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील चार जागांपैकी दक्षिण मध्यची जागा काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांच्यासाठी मागितली होती. या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यापूर्वी खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत येथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यामुळे शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नाही. तर कोल्हापूरची जागा सोडल्यामुळे शिवसेनेने सांगलीवर हक्क सांगितला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरेंनीसांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली त्याबद्दल आमच्या सर्वांची नाराजी आहे. युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे होता आता पुन्हा फेरविचार केला पाहिजे. भिवंडी,सांगली या पारंपारिक आमच्या जागा आहेत. या जागांवरती आम्ही आणि आमचे कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत. दिल्लीतील आमचे नेतेही यावरती आग्रही आहेत. सांगलीची जागा ही वसंतदादा पाटील यांच्यापासून राहिलेली आहे.या जागा सोडणे आम्हाला खूप वेदनादायी आहेत त्यामुळे याचा फेरविचार झाला पाहिजे. सांगली,भिवंडी आणि मध्य मुंबई यासाठी अजूनही आम्ही आग्रही आहे आणि प्रयत्न करत आहोत त्यांनी फेरविचार करावा,असे बाळासाहेब थोरात म्हणाले.