मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs PBKS Highlights : हैदराबादच्या फलंदाजांचा पुन्हा धुमाकूळ, पंजाबचं २१५ धावांचं लक्ष्य सहज गाठलं

SRH vs PBKS Highlights : हैदराबादच्या फलंदाजांचा पुन्हा धुमाकूळ, पंजाबचं २१५ धावांचं लक्ष्य सहज गाठलं

May 19, 2024 07:23 PM IST

SRH vs PBKS Highlights : आयपीएल २०२४ ६९ वा सामना आज सनरायझर्य हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने पंजाबचा धुव्वा उडवला.

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ६९ व्या सामन्यात सनरायझर्य हैदराबादने पंजाब किंग्सचा ६ विकेट्सने पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात २१४ धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

प्रत्युत्तरात हैदराबादने १९.१ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात २१५ धावा करत सामना जिंकला. 

या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे. राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना गमावला किंवा सामना अनिर्णित राहिला, तर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर राहील. अशा स्थितीत सनरायझर्स क्वालिफायर-एक सामन्यात प्रवेश करेल.

राजस्थानचा संघ कोलकात्याला पराभूत करण्यात यशस्वी ठरल्यास कोलकाता प्रथम आणि राजस्थान दुसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचेल. अशा स्थितीत सनरायझर्सला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल. प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. सनरायझर्सने १४ सामन्यांत ८ विजय आणि ५ पराभवांसह साखळी फेरी पूर्ण केली. एक सामना पावसाने वाहून गेला. संघाने एकूण १७ गुण मिळवले.

त्याचबरोबर कोलकाताचे १९ आणि राजस्थानचे सध्या १६ गुण आहेत. आरसीबीचे १४ गुण आहेत.

सनरायझर्स हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सलामीवीर अभिषेक शर्माने २८ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने २६ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि दोन षटकारांसह ४२ धावा केल्या. 

राहुल त्रिपाठी (३३) आणि नितीश रेड (३७) यांनीही सनरायझर्स हैदराबादसाठी उपयुक्त योगदान दिले. ट्रॅव्हिस हेडला या सामन्यात विशेष काही करता आले नाही. तो शुन्यावर बाद झाला. पंजाब किंग्जचा चालू मोसमातील हा नववा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत.

पंजाबचा डाव

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ५ गडी गमावत २१४ धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ७१ धावा केल्या. प्रभासिमरनने ४५ चेंडूंचा सामना केला आणि ७ चौकारांव्यतिरिक्त ४ षटकार ठोकले. अथर्व तायडेने २७ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावांची तुफानी खेळी केली.

अथर्व आणि प्रभासिमरन यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रिली रॉसोने ४९ (२४ चेंडू, ३ चौकार आणि २ षटकार) आणि कर्णधार जितेश शर्माने नाबाद ३२ धावांचे (१५ चेंडू, २ चौकार आणि २ षटकार) योगदान दिले.

टी-२० वर्ल्डकप २०२४