Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास यांनी आपल्या भावावर टीका करत शरद पवारांची बाजू घेतली आहे. रविवारी बारामतीतील काटेवाडी परिसरातील रहिवाशांशी बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना नालायक म्हटले. श्रीनिवास यांचा मुलगा योगेंद्र पवार यांनी यापूर्वीच शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
श्रीनिवास पवार म्हणाले, "अजित पवार यांच्या चांगल्या-वाईट दिवसात मी नेहमीच त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांना साथ दिली. मात्र, या सर्व काळात मी त्यांना आमच्या चर्चेत सांगितले की, तुझ्याकडे आमदारकी आहे तर खासदारकीतरी आपण शरद पवार साहेबांना दिली पाहिजे. शरद पवार साहेबांनी आपल्यावर अनेक उपकार केले आहेत. आज ते ८३ वर्षांचे असताना त्यांची साथ सोडून जाणे हे मला पटले नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. कारण पुढची काही वर्ष आपल्याला दुसऱ्या कुणाकडून तरी लाभ मिळणार आहे. त्यामुळे याच्या सारखा नालायक माणूस कुणी नाही असे,” श्रीनिवास पवार म्हणाले.
श्रीनिवास पवार यांनी कडेवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा देत अजित पवार यांचावर टीका केली. श्रीनिवास पवार म्हणाले, जून नागरिक आपल्या शेतावर जातात, बांधावर जात असतात, त्यांनी जमीन आपल्या नावावर केली म्हणजे त्यांना घराबाहेर काढायचे नसते. ज्यांना कुणाला पदे आणि प्रतिष्ठा मिळाली असेल ती शरद पवार साहेबांमुळे मिळाली आहे आणि त्याच साहेबांना वय झाले म्हणून आता सांगायचं कीर्तन करा, घरी बसा, हे मला पटत नाही. मी राजकारणी माणूस नाही. पण, या गोष्टी मला पटत नाही. जशी औषधांवर एक्सपायरी डेट असते. तशी काही नात्यामध्येही असते. ती संपली असे समजून पुढे चालत जावे लागले, असे देखील श्रीनिवास पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, त्याचे वाईट वाटून घ्यायचे नाही. मला स्वाभिमानाने जगायचे नाही. ज्यांच्या कडून लाभ मिळतो म्हणून आपल्या व्यक्तीची साथ सोडून दुसऱ्या कडे जाणे मला पटत नाही. मला वाटत नाही त्यांना शांत झोप लागत असेल. साहेबांनी काय केले हा प्रश्न विचारणे म्हणजे आश्चर्य आहे. साहेबांनीच आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले, मंत्री पदे दिली तरी सुद्धा म्हणायचे त्यांनी आपल्यासाठी काही केले नाही? असा काका मला मिळाला असता तर मी खुश झालो असतो अशी मिश्किल टीका देखील त्यांनी बोलतांना केली.
पवार म्हणाले, ही चाल कुणाची आहे ही माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासन भाजपला आरएसएसला पवार हे नाव संपवायचे आहे. त्यातूनच ही खेळी त्यांनी खेळली आहे. त्यांनी आता पर्यंत खूप प्रयत्न केला. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नव्हते. तुम्हाला इतिहास माहिती आहे, की घर फोडले की ते कुटुंब संपवता येतं. जर कुटुंब एकत्र असेल तर त्या घराला काही ही होत नाही. मला हे बिलकुल पटले नाही. वय वाढले म्हणून तुम्ही साहेबांना कमजोर समजू नका, असेही श्रीनिवास पवार म्हणाले.