Thane Residential Building Fire: ठाणे जिल्ह्यातील एका सात मजली निवासी इमारतीला सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगाची माहिती मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले. आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नासून २२५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिसरातील कौसा येथील इमारतीला मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी आग लागली. इमारतीतील सुमारे २२५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. खबरदारी म्हणून इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
स्थानिक अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि वीज पुरवठा कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पहाटे अडीच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
सोमवारी इमारतीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे वीज कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. विद्युत मीटर कक्षात आग लागल्याने ५० वीज मीटर जळून खाक झाली आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.