Israel-Iran War : इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. मध्यपूर्व क्षेत्रात निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या चिंतेचे कारण म्हणजे या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा तसेच भूराजकीय आणि आर्थिक हितसंबंध. युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताचे आर्थिक हितही धोक्यात आले आहे. या दोन्ही देशात सुमारे ३० हजार भारतीय राहतात. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची प्राथमिकता असून भारतीय दूतावास नागरिकांच्या संपर्कात असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाल्यास त्याचा भारताच्या आर्थिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो. भारताची इराणसोबतची वाढती आर्थिक भागीदारी, विशेषत: चाबहार बंदर विकासासारखे प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. चाबहार बंदर हे पाकिस्तानमधील चीन विकसित करत असलेल्या ग्वादर बंदराजवळ आहे. हे बंदर या प्रदेशातील व्यापारी मार्ग आणि कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. दोन्ही देशांमधील लष्करी कारवाईमुळे या प्रयत्नांना धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC) मध्येही अडथळा येऊ शकतो.
जर या प्रदेशात संघर्ष वाढला तर तो संपूर्ण पश्चिम आशियाई प्रदेशात पसरण्याची शक्यता आहे. यामुळे हा प्रदेश पुन्हा अस्थिर होऊ शकतो. त्यामुळे भारताची ऊर्जा, सुरक्षा आणि व्यापार मार्ग प्रभावित होऊ शकतात. या संघर्षाचा धोका जवळच्या देशांनाही होऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.
भारताला इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारताचे इराणशी संबंध मजबूत आहेत. दोन्ही देशांमध्ये विविध बाबतीत आर्थिक देवाणघेवाण मोठी आहे. या सोबत अनेक सहकार्य करार देखील झाले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची इस्रायलसोबतची भागीदारी देखील वाढली आहे.
इराणसोबतचे भारताचे आर्थिक संबंध व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह भारताच्या इराणशी असलेल्या व्यापार संबंधांमध्ये तांदूळ आणि औषधीपासून यंत्रसामग्री आणि दागिन्यांपर्यंतच्या आयात-निर्यातीचा समावेश आहे. भारतीय कंपन्या इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये मोठे व्यवसाय करत आहेत. कंपन्या विकास प्रकल्पांपासून व्यवसाय भागीदारीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये सहभागी आहेत. जर इराण आणि इस्राइलमधील तणाव कायम राहिल्यास या कंपन्यांना आर्थिक फटका बसू शकतो.
मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये ९० लाखांहून अधिक भारतीय राहतात. यापैकी सुमारे १० हजार लोक इराणमध्ये राहतात आणि १८ हजारांहून अधिक लोक इस्रायलमध्ये राहतात. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल देशांमध्ये (बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती) मध्ये सुमारे ९० लाख भारतीय नागरिक राहतात. जगभरात भारतीयांची लोकसंख्या ३ कोटींहून अधिक आहे.
२० व्या शतकाच्या मध्यापासून मध्य पूर्व हा जगातील सर्वात अस्थिर आणि अशांत भाग आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष, तसेच शेजारी देशासोबतचा संघर्ष हा अनेक दशके जुना आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. इस्रायलने १९४८ ते १९७३ दरम्यान इजिप्त, सीरिया आणि जॉर्डनसह अरब शेजारी राष्ट्रांशी चार मोठी युद्धे केली. १९६० च्या मध्यात पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची निर्मिती झाल्यापासून, तिला इतर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. त्यात लेबनॉनमधील हिजबुल्ला, पॅलेस्टिनी प्रदेशातील हमास आणि येमेनमधील हुथी यांचाही समावेश होता.
१९७९ मध्ये राजेशाही उलथून टाकेपर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये तेल आणि शस्त्रास्त्रांच्या सौद्यांसह राजनैतिक आणि आर्थिक संबंध होते. इराणच्या युद्धादरम्यान दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. नंतर हा तणाव इतका वाढला की २००५ मध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्त्रायलला देश म्हणण्यास नकार दिल होता.