Sangli Superstition News : सांगलीत एक अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली आहे. ही घटना सांगलीतील मिरज तालुक्यात घडली आहे. कवलापूर गावात गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी एकाने अंधश्रद्धेतून एका जिवंत बोकडाला उलटे लकवले होते. या बोकडाचा तब्बल सात दिवसानंतर मृत्यू झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ही घटना कळल्यावर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील कवलापूर (ता. मिरज) येथे तासगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका लिंबाच्या झाडाला आठवड्याभारापूर्वी सोमवती अमावास्येच्या दिवशी अंधश्रद्धेतून एका जिवंत बोकडाचे दोन्ही पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठ दिवस बोकड त्याच अवस्थेत लटकून राहिल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला. हा प्रकार गावातील शिवाजीराव पाटील यांनी पाहीला. त्यांनी ही घटना अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांना कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उशीर झाला होता. आठवडाभर बोकड झाडाला लटकून राहिल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला.
दरम्यान, अघोरी प्रकारातून या बोकडाला अमावस्येच्या रात्री लटकावन्यात आल्याची माहिती पुढे आली. हा अघोरी प्रकार असून अंधश्रद्धेतुन झल्याने पोलिसांनात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी याची परिसरातील शेतकऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी काही नागरिकांनी सांगितले की, गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी सोमवती अमावस्येच्या रात्री एका गाडीतून काही जण आले. त्यांनी गाडीतून बोकड काढून त्याला येथे लटकवले असल्याचे सांगितले. अशा प्रकारे बळी देण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मांत्रिकाच्या किंवा देवरुर्षीच्या सल्ल्यानुसार हा प्रकार झाला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जिवंत बोकडाला असे लातकावून त्याचा अघोरी बळी देणे, ही अमानवी कृती आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध घेऊन जादूटोणाविरोधी कायद्यानुसार व प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी अंनिसने केली आहे. या बाबत कुणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या