Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडवा मराठी नववर्ष असून या मराठी नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोभा यात्रा काढल्या जाणार आहेत. मनसेसह इतरही काही मेळावे होत असल्याने रस्त्यावर होणारी गर्दी पाहता मुंबई, ठाणे, डोंबिवली येथील वाहतुकी मोठा बदल करण्यात आला आहे. काही मार्ग बंद तर काही मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. या बदलांची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गुडीपाडव्यानिमित्त गिरगाव येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढण्यात येतात. यामुळे येथील काही मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबईत गिरगावची शोभायात्रा व विशिष्ट भाग वगळता उर्वरित भागात वाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार आहे. रात्री दक्षिण मध्य मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून त्यानुसार घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम व पूर्व द्रूतगती मार्गांवर देखील वाहतुकी मोठा बदल करण्यात आला आहे. आज दुपारी १ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तर काही ठिकाणांवर वाहनांच्या पार्किंगवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
केळुसकर मार्गावर वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आली आहे. तर एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन सी केळकर मार्गांवर नो पार्किंग करण्यात आले आहे. एसवीएस रोडवर सिद्धीविनायक मंदिर चौक ते येस बँकेच्या जंक्शनपर्यंत नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.
नागरिकांनी एसवीएस रोडवर सिद्धीविनायक मंदिर चौक ते येस बँकेच्या जंक्शन येथील वाहतुकीत बदल करण्यात आला असून प्रवास करणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग म्हणून सिद्धीविनायक मंदिर चौकापासून एस के बोले मार्ग आगर बाजार, पोर्तुगीज चर्चवरून डावं वळण घेत गोखले मार्गानं पुढे जाता येणार आहे. तर राजा बडे चौक ते केळुसकर मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला असून प्रवास करणाऱ्यांनी एलजे मार्ग, गोखले मार्ग, स्टीलमॅन जंक्शनहून उडवं वळण घेत एसवीएस मार्गावर जावे लागणार आहे.
ठाण्यात आज गुढीपाडव्यानिमित्त आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्रा निघणार असल्याने वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज ठाण्यातील कोर्टनाका चौक ते जांभळीनाका व बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ प्रवेशबंदी राहणार आहे. या मार्गावरील जाणारी वाहने ही आनंद आश्रममार्गे, टॉवरनाका, तलावपाळीमार्गावरून पुढे वळवण्यात आली आहे. तर खारकरआळी पासून जांभळीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत बदल करून येथील वाहतूकिला महाजनवाडी सभागृहाजवळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरची वाहतूक ही महाजनवाडी सभागृहापासून कोर्टनाकामार्गे वळवण्यात आली आहे.
दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, डॉ. मूस चौक येथून मुख्य बाजारपेठमार्गे जांभळीनाका या मार्गे जाणाऱ्या वाहनांना ए-वन फर्निचर दुकानापाशी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहतूक ही राघोबा शंकर रोड, माता रमाबाई चौकमार्गे पुढे वळवण्यात आली आहे. गोखले रस्त्यापासून येथून राम मारुती रोडच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना तीन हात नाकामार्गे पुढे मार्गस्थ व्हावे लागणार आहे. तीन हात नाका, हरिनिवास किंवा मल्हार सिनेमामार्गे ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या बसगाड्यांना तीन हात नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या बस नितीन कंपनी, अल्मेडा रोड, खोपट, टेंभीनाकामार्गे वळवण्यात आल्या आहेत.