Pune wakad Suicide : पुण्यात वाकड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या ४ वर्षांच्या मुलासह ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना वाकड येथील रीगालिया या उच्चभ्रू सोसायटीत शनिवारी सकाळच्या ८.३० च्या सुमारास घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कोमल जगदीश हरिश्चंद्र (वय ३२, रा. रिगालिया, सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल यांनी इमारतीमधून उडी मारताना त्यांच्या आपला चार वर्षांचा मुलगा विहान याला कडेवर घेऊन उडी मारली. या घटनेत दोघांचाही जागेरच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोमल या स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर परदेशात आणि भारतात उपचार सुरू होते. मात्र, त्या यातून बऱ्या होत नव्हत्या. या प्रकारानंतर त्यांचे कुटुंबीय व शेजारी हादरले आहेत. याबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
पुण्यात पत्नीशी फोनवर बोलतो या संशयातून एका तरूणावर काही जणांनी मिळून धारदार शस्त्राने वार केल्याची गहटण ताडीवाला रोड येथील गगन उनो इमारतीजवळ घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून एकावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय लक्ष्मण निरगुडे (३६, रा. सीएमई गेट, ढोरे चाळ) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. फिर्यादी हा शनिवारी दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास ताडीवाला रोड येथील गगन उनो बिल्डिंगजवळ कारमध्ये मोबाइलवर चित्रपट पाहत होता. यावेळी एक जण त्याच्या जवळ आला. विजय हा त्यांच्या पत्नीबरोबर फोनवर बोलतो, याचा राग मनात धरून त्याने त्याला जीवे मारण्याची धमकी देत, त्याच्या जवळील हत्याराने डाव्या गालावर वार केला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.