
इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा शेवट अत्यंत निराशाजनक झाला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही १८ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली.
यानंतर अर्जुनने गोलंदाजीतही चांगली सुरुवात केली होती, पण त्याच्या स्पेलच्या तिसऱ्याच षटकात त्याला दुखापत होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अर्जुनसाठी तर ही निराशा होतीच, पण मुंबई इंडियन्ससाठीही हा मोठा धक्का ठरला.
अशा स्थितीत प्रश्न पडला की, अखेर असे काय घडले की अवघे १४ चेंडू टाकून अर्जुनला मैदान सोडावे लागले. अर्जुनला या मोसमात पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली, पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही.
मुंबई इंडियन्सकडे अतिशय मजबूत खेळाडूंची फौज आहे. त्यामुळेच अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आले नाही. जेव्हा अर्जुन आयपीएल २०२४ मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. अचूक लाईन आणि लेन्थने तो चांगल्या गतीने गोलंदाजी करत होता. त्याचा गोलंदाजी रनअप देखील पूर्वीपेक्षा खूपच चांगला दिसत होता, परंतु अर्जुन तेंडुलकर अचानक दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतला.
वानखेडेच्या दमट उष्णतेमुळे त्याची प्रकृती खराब झाली होती, त्यामुळेच अर्जुनने हॅमस्ट्रिंगची तक्रार केली आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अर्जुन गेल्या मोसमातही मुंबई इंडियन्सकडून मैदानावर दिसला होता. त्याने आयपीएल २०२३ मध्ये एकूण ४ सामने खेळले, ज्यात त्याने ३ विकेट्सही घेतल्या. मात्र, अर्जुनला फलंदाजीत फारशी संधी मिळाली नाही.
संबंधित बातम्या
