इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ६७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला.
अशा प्रकारे आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात २१४ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १९६ धावा करू शकला. मुंबईचा हा दहावा पराभव आहे. लखनौचा हा सातवा विजय आहे. मुंबईकडून नमन धीरने २८ चेंडूत ६२ तर रोहित शर्माने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या. मात्र, विजयासाठी हे पुरेसे नव्हते. लखनौकडून रवी बिश्नोई आणि नवीन उल हकने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
आता या सामन्यात लखनौचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मुंबईची धावसंख्या १९ षटकांत ५ बाद १८१ धावा. नमन धीर २४ चेंडूत ४९ धावांवर खेळत आहे. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. तर इशान किशन १४ चेंडूत १४ धावांवर खेळत आहे.
नेहल वढेराच्या रूपाने मुंबईला पाचवा धक्का बसला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. त्याला एकच धाव करता आली. आता मुंबईला विजयासाठी ३० चेंडूत ९० धावांची गरज आहे.
सामना मुंबईच्या हातातून जवळपास निसटला आहे. मुंबईने १४व्या षटकात ११६ धावांवर चौथी विकेट गमावली आहे. हार्दिक पांड्या १३ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याला मोहसीन खानने बाद केले.
रोहित शर्मा ६८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो ११व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोहसीन खानकरवी रवी बिश्नोईकरवी झेलबाद झाला. हिटमॅनने या सामन्यात १० चौकार आणि ३ षटकार मारले. मुंबईने १० धावांत तीन विकेट गमावल्या आहेत. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी इशान किशन क्रीजवर आहे. १२ षटकांनंतर एमआयची धावसंख्या १०१/३ आहे.
मुंबईची पहिली विकेट ८८ धावांवर पडली. नवीन-उल-हकने डेवाल्ड ब्रेविसला क्रुणाल पांड्याकरवी झेलबाद केले. २० चेंडूत २३ धावा करून तो बाद झाला. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रोहित शर्मा (६१) क्रीजवर उपस्थित आहे. मुंबईला आता विजयासाठी ६६ चेंडूत १२७ धावांची गरज आहे.
रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे ४३ वे अर्धशतक आहे. त्याचवेळी डेवाल्ड ब्रेविसही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. ८ षटकांनंतर संघाची धावसंख्या ७८/० आहे. मुंबई इंडियन्सला विजयासाठी ७२ चेंडूत १३७ धावांची गरज आहे.
लखनौ सुपर जायंट्सने २० षटकात ६ विकेट गमावत २१४ धावा केल्या. पहिल्या १० षटकांत लखनौची धावसंख्या ३ गडी बाद ६९ धावा होती. मात्र, यानंतर निकोलस पुरनने अवघ्या २९ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७५ धावा करत संघाला संकटातून बाहेर काढले. तर केएल राहुलने ४१ चेंडूत ५५ धावा केल्या. लखनौने शेवटच्या १० षटकांत ३ चौकार आणि ३ षटकार खेचले. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
१९ षटकांनंतर लखनौ सुपर जायंट्सची धावसंख्या ६ गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा आहे. नुवान तुषाराने १९व्या षटकात केवळ ९ धावा दिल्या. क्रुणाल पांड्या ७ चेंडूत १२ धावांवर तर आयुष बडोनी ५ चेंडूत ६ धावांवर खेळत आहे.
निकोलस पूरन (७५) नंतर कर्णधार केएल राहुल (५५) देखील बाद झाला. पूरनला तुषारने तर केएल राहुलला पियुष चावलाने बाद केले. दोघांमध्ये १०९ धावांची भागीदारी झाली.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला निकोलस पुरन दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे नववे अर्धशतक आहे. १५ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून पूरण ३०० च्या स्ट्राईक रेटने ६६ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याचवेळी केएल राहुलही ४७ धावा करून उभा आहे. लखनौचा स्कोअर १५९/३ आहे.
पियुष चावलाने लखनौला तिसरा धक्का दिला. त्याने १०व्या षटकात दीपक हुडाला नेहल वढेराकरवी झेलबाद केले. त्याला केवळ ११ धावा करता आल्या. निकोलस पुरन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी केएल राहुल क्रीजवर उपस्थित आहे. ९.४ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६९/३.
पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर पियुष चावलाने मार्कस स्टॉइनिसला बाद केले. तो २२ चेंडूत २८ धावा करून परतला. दुसऱ्या विकेटसाठी केएल राहुल आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. तत्पूर्वी, डावाच्या पहिल्याच षटकात नुवान तुषाराने देवदत्त पडिक्कलला बाद केले. तो गोल्डन डकचा बळी ठरला. सहा षटकांनंतर संघाची धावसंख्या ५६/२ आहे.
लखनौला पहिला धक्का एका धावेवर बसला. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नुवान तुषाराने देवदत्त पडिक्कलला बाद केले. तो एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्कस स्टॉइनिस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी केएल राहुल आहे.
मुंबई इंडियन्स : ईशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. एमआयच्या कर्णधाराने सांगितले की, या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या आणि तिलक वर्माला विश्रांती देण्यातआली आहे. टीम डेव्हिड देखील या सामन्याचा भाग नाही. वर्माच्या जागी डेव्हॉल्ड ब्रेविसला संधी मिळाली आहे.
त्याचवेळी केएल राहुलने सांगितले की, क्विंटन डी कॉकच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी मिळाली आहे.
वानखेडे हे भारतातील ऐतिहासिक मैदानांपैकी एक आहे. या मैदानावरची पीच लाल मातीची आहे. या प्रकारच्या खेळपट्टीवर सहसा बाउन्स दिसून येतो. सुरुवातीला या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकेल पण त्यानंतर फलंदाजांचे काम सोपे होईल. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि त्यामुळे हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात. ही खेळपट्टी सपाट आहे, ज्यामुळे चौकार आणि षटकार मारणे सोपे होते.
वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ११५ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५३ सामने जिंकले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने ६२ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने या मैदानावर ६० सामने जिंकले आहेत.
संबंधित बातम्या