वाढता मानसिक तणाव, विविध सामाजिक, कौटुंबीक तसेच इतर कारणांमुळे जगभरात आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलं आहे. आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून याविषयाबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या हेतुने १० सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) च्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ७ लाख व्यक्ती आत्महत्या करून स्वतःला संपवतात. जगभरात आत्महत्या करणाऱ्यांपैकी जवळजवळ ७७ टक्के आत्महत्या या गरीब आणि विकसनशील देशांमध्ये होतात. घडलेल्या प्रत्येक एका आत्महत्येमागे २० जण आत्महत्येचा प्रयत्न करत असतात, त्याचवेळी अनेकांच्या मनात आत्महत्येचा गंभीर विचार सुरू असतो, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
भारतात सर्वाधिक आत्महत्या महानगरांमध्ये
समाजात साधनसंपन्न, सुखवस्तु असलेल्या वर्गामध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आकडेवारीमधून दिसून येतं. भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगलुरू या शहरांमध्ये सर्वांधिक आत्महत्या होत असल्याचे आकडेवारीमधून दिसून येते. भारतात एकूण ५३ महानगरांच्या तुलनेत या चार मोठ्या शहरांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण ३५ टक्के असल्याचे दिसून येते.
आत्महत्या हा विषय जगात सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर चिंतेचा विषय बनला असून आत्महत्या आणि आत्मघातकी वर्तन रोखण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे.
जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त मोहिमेचा एक भाग म्हणून, WHO ने काही मार्गदर्शक तत्त्वे शेअर केली आहेत. ज्यांना कुणाला चिंता सतावते, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा धोका आहे अशांसाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.
- अशी व्यक्ती तुमच्यासोबत राहत असल्यास जीविताला इजा पोहचवणाऱ्या कुठल्याही गोष्टी आजूबाजूला ठेवू नका
- तत्काळ धोका संभावित असल्यास आपात्कालिन सेवांशी संपर्क साधा. त्यांना एकटे सोडू नका.
- त्यांना कसे वाटते याबद्दल सतत बोला
- त्यांना वैद्यकीय मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करा
२००३ साली WHO आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेंशन यांनी पहिल्यांदा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला होता. ‘कृतीतून आशा निर्माण करणे’ ही २०२१-२३ साठी त्रिवार्षिक थीम निवडली गेली आहे. ज्यांच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येतात त्यांच्या मनात आशा निर्माण करणे गरजेचे असते. अशा व्यक्तिंना मदत करण्यासाठी तत्पर असलेले, त्यांची काळजी घेणारे लोक आजूबाजूला आहे हे त्यांना कळू देणे आवश्यक असते.
शिवाय एखादी व्यक्ती आयुष्यात कठीण काळातून जात असल्यास त्या व्यक्तीला मानसिक आधार देणे, त्याच्या उपयोगाला येईल अशी कृती करणे या गोष्टींचे आत्महत्या रोखण्यामध्ये फार महत्त्व असते.
भारतातील काही प्रमुख आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन क्रमांक:
राष्ट्रीय हेल्पलाइन- 988
दिल्ली: मैत्री हेल्पलाइन 011-23389090
चेन्नई - स्नेहा फाउंडेशन - 044-24640050
संबंधित बातम्या