मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balasahebancha Raj : शिवसेना कुणाची हे ठरत नसतानाच 'बाळासाहेबांचा राज' रंगमंचावर

Balasahebancha Raj : शिवसेना कुणाची हे ठरत नसतानाच 'बाळासाहेबांचा राज' रंगमंचावर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 18, 2023 01:37 PM IST

Marathi play on raj thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारस कसे आहेत हे सांगणारं नवं नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे.

Eknath Shinde - Raj Thackeray - Uddhav Thackeray
Eknath Shinde - Raj Thackeray - Uddhav Thackeray

Marathi play on raj thackeray : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडून हा पक्ष नेमका कुणाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारात असतानाच आता 'बाळासाहेबांचा राज' हे नाटक आता रंगमंचावर येत आहे. बाळासाहेबांचे खरे वारस राज ठाकरे हेच असल्याचं या नाटकातून दाखवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सुरू असल्यानं उद्धव ठाकरे यांची मोठी गोची झाल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेत फूट पाडून भाजपनं शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्याची सत्ता हिसकावून घेतल्यानंतर आता मुंबई हे भाजपचं लक्ष्य आहे. या निवडणुकीच्या आधी संपूर्ण शिवसेना पक्षच उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घ्यायचा, असा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे या आव्हानाला तोंड देत असतानाच आता राज ठाकरे यांच्या मनसेनं मोठं आव्हान निर्माण केलं आहे. मनसेलाही मुंबईत आपली ताकद दाखवून द्यायची आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर 'बाळासाहेबांचा राज' हे नाटक महत्त्वाचं मानलं जात आहे.

'बाळासाहेबांचा राज' या नाटकाची कथा राजकारण, सत्ता, कौटुंबिक संबंध आणि बंड याभोवती फिरते. नाटकाचा पहिला शो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी, २३ जानेवारीला प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार आहे. त्यानंतर मुंबई व ठाण्यात नाटकाचे शो होणार आहेत.

राज ठाकरे हे सुरुवातीपासून शिवसेनेत सक्रिय होते. बाळासाहेबांनंतर राज ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व करतील, असं मानलं जात होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाल्यानंतर राज बाजूला पडले. पक्षांतर्गत वर्चस्वातून दोन्ही भावांमध्ये मतभेद झाल्यानंतर राज यांनी २००६ साली शिवसेनेला रामराम ठोकला. तेव्हापासून आपणच बाळासाहेबांचे खरे राजकीय वारस आहोत हे दाखवून देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न राहिला आहे. हे नाटक तेच अधोरेखित करणार आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपनं सध्या राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेतलं आहे. त्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं अधिकाधिक राजकीय नुकसान करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हे नाटक त्याच डावपेचांचा भाग असल्याचं बोललं जात आहे.

यापूर्वी २००९ साली आलेल्या 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या चित्रपटानं अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेला हातभार लावला होता. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर' या चित्रपटामुळं आनंद दिघे यांची प्रतिमा अधिक भव्य करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा पाया घालण्यास या चित्रपटाची मदत झाली असं बोललं जातं. राज यांच्यावरील नाटक उद्धव ठाकरे यांना कितपत धक्का देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL_Entry_Point