Shinde-Fadnavis Govt : राज्यातील शिंदे सरकार कोसळलं तर कॉंग्रेसचे तब्बल २२ आमदार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार असल्याचं धक्कादायक वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली असून राज्यात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय खैरेंच्या या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतही वाद पेटण्याची शक्यता आहे.
औरंगाबादेतील एका कार्यक्रमात शिवसैनिकांना संबोधित करताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिंदे गटाच्या १६ आमदारांना त्यांची आमदारकी जाण्याची भीती आहे. सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर कारवाई केली तर सरकार कोसळू शकतं. त्यावेळी कॉंग्रेसचे २२ आमदार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिबा देतील, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरेंनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे खुप हुशार राजकारणी असून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी तजवीज करून ठेवल्याचाही दावा खैरेंनी केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपकडे सर्वाधिक आमदार असूनही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळं त्यांचा चेहरा नेहमीच पडलेला असतो. त्यामुळं आता त्यांनी भविष्यात मुख्यमंत्रीपदासाठी डावपेच आखले असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले.
राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते- खैरे
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राष्ट्रपती राजवट लागू होण्याची कारणं सर्वांना माहिती आहे. त्यामुळं आता शिवसैनिकांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करावी असंही खैरे म्हणाले. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोणतंच काम करत नसून त्यांनी मविआ सरकारच्या काळात १२ आमदारांची नियुक्ती जाणीवपूर्वक केली नाही, असाही आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे.