Sanjay Raut on Raj Thackeray Delhi Visit : भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी व शहा यांच्या पक्षाला कोणी मदत करणार असतील तर अशा लोकांची ओळख महाराष्ट्रद्रोही अशी राहील,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपनं आता मनसेलाही सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेनंतर मनसेला महायुतीत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत.
खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना त्यांनी मनसे किंवा राज ठाकरे यांचा थेट कुठंही उल्लेख केला नाही. मात्र, त्यांना जे काही सांगायचं होतं ते सांगून टाकलं.
'लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड कायम राहील हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकलंय. त्यामुळंच शिवसेनेच्या मतामध्ये फूट पाडून, गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का ही कारस्थानं दिल्लीत गेल्या काही काळापासून सुरू आहेत. कोणाबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. दिल्लीत जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाही आहे. मात्र, त्यांना रात्री भेट मिळाली नाही असंही मला कळलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे, शरद पवार व महाविकास आघाडीलाच यश मिळतंय या भीतीपोटी हे सर्व सुरू आहे, असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला.
‘महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर ज्यांचं प्रेम आहे ते भाजपसोबत जाण्याची भूमिका घेणार नाहीत असं मला वाटतं. तरीही, एमआयएम टाइपचे काही पक्ष महाराष्ट्रात असतील आणि ते बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या विरोधात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी-शाहांना मदत करत असतील तर अशा पक्षांकडं महाराष्ट्रद्रोही म्हणून पाहिलं जाईल, असं राऊत यांनी ठणकावलं.
‘महाराष्ट्रात अजून बरंच राजकारण घडायचं आहे. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन मोदी-शहांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता सूज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा जनतेनं समाचार घेतला आहे. महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर जनता सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
संबंधित बातम्या