‘महाराष्ट्रधर्मासाठी, सामान्यांसाठी महाशक्तीच्या विरोधात लढणारे नेते आज लोकांना हवे आहेत. राज ठाकरे यांनी अशीच भूमिका घ्यायला हवी. त्यांनी विचार करावा आणि महाराष्ट्रधर्म जपण्याला प्राधान्य द्यावं,’ असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी राज ठाकरे यांना विचार करण्याचं आवाहन केलं.
'जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असतील तर भाजपला दक्षिणेत प्रतिसाद मिळण्याची गरज आहे. मात्र, आज वातावरण वेगळं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विचारांनी प्रेरित झालेलं राज्य आहे. भाजपला जाणीव झालीय की महाराष्ट्रातील लोक त्यांच्यासोबत नाहीत. त्यामुळं छोटे-छोटो पक्ष सोबत घेऊन मतविभागणी करायची असा त्यांचा प्रयत्न आहे. पाच वर्षांपूर्वी ज्यांना अजिबात महत्त्व दिलं जात नव्हतं, अशा पक्षांनाही महत्त्व दिलं जात आहे, असं रोहित पवार म्हणाले.
‘राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी या सगळ्याचा विचार करावा. भाजपला आज गरज आहे म्हणून ते महत्त्व देतील. गरज संपली की बाजूला टाकलं जाईल. याची जाण ठेवून राज ठाकरेंनी महाराष्ट्र धर्म जपण्याचा प्रयत्न करावा. महाविकास आघाडीला साथ द्यावी,’ असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.
'भाजप हा पक्ष देशाची राज्यघटना आणि लोकशाहीच्या विरोधात आहे. असा विचार आपल्या महाराष्ट्रात टिकू नये म्हणून आम्ही एकत्रित आलोय. प्रकाश आंबेडकर साहेबही येतील असा विश्वास आहे. ते वेगळे लढले तर मतविभागणी होऊन २०१९ प्रमाणे भाजपला फायदा होऊ शकतो. पण आता तसं होणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले.
'मी राज ठाकरे यांच्या भाषणाचा फॅन आहे. २०१९ मध्ये ते लोकांच्या बाजूच्या भूमिका मांडत होते. त्यांची भाषणं बेरोजगारी, तरुणांविषयी होती. नंतर त्यांची भाषणं बदलत गेली. ईडी किंवा अन्य संस्थांना घाबरून कोणी भूमिका बदलत असेल तर ते योग्य नाही. राज ठाकरे धाडसानं उभे राहिले तर त्यांच्याबद्दल आपुलकी आणखी वाढेल, असंही रोहित पवार म्हणाले.