काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इलेक्टोरल बॉन्डवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी याला जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट संबोधले आहे. काही दिवसापूर्वीच इलेक्टोरल बॉन्डचे सत्य समोर आले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी ईडी आणि सीबीआयच्या कार्यप्रणालीवरही टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, सीबीआय आणि ईडी तपास करत नाहीत तर खंडणी वसुली करतात. भारत जोडो यात्रेदरम्यान भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे. निवडणूक रोखे देशातील मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असून ईडी-सीबीआय वसुलीचे काम करतात. या पैशांचा वापर भाजप दुसरे पक्ष फोडण्यासाठी करतो, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
देशातील ज्या कंपन्यांवर ईडी सीबीआय सारख्या तपास यंत्रणांनी कारवाई केली, त्यांनीच भाजपला देणगी दिली आहे. सीबीआय, ईडी, आयटी ही भाजप आणि आरएसएसची शस्त्रे आहेत. या आता भारताच्या तपास यंत्रणा राहिल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालय याची चौकशी करेल, अशी अपेक्षा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
भाजपने सुरू केलेल्या इलेक्टोरल बाँड्सची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानंतरच हे रॅकेट समोर आले आहे. देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही. भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून अनेक कंपन्यांकडून पैसे उकळते. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली जाते, त्या कंपन्या भाजपला देणगी देतात. ही पंतप्रधान मोदींची आयडिया आहे. हे नितीन गडकरींनी केलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट काही कंपन्यांना दिले. त्यांच्याकडून मोठी रक्कम इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून वसुली केली आहे. हा राष्ट्रद्रोह आहे. या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात आहे.
राहुल गांधी म्हणाले सीबीआय-ईडी आता भाजपचे शस्त्र असून त्यांच्या नियंत्रणात काम करत आहे. निवडणूक आयोग, सीबीआई-ईडी आता भाजप व आरएसएसचे शस्त्र झाले आहेत. त्यांनी विचार करावा की एक दिवस भाजपचे सरकार बदलणार आहे. त्यानंतर कारवाई होईल. त्यांच्यावर अशी कारवाई होईल की, मी गँरेंटी देतो पुन्हा असा प्रकार होणार नाही.
संबंधित बातम्या