Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

Mar 18, 2024 07:56 PM IST

MNS BJP Alliance talks : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. राज यांच्या या दौऱ्यामुळं मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग आला आहे.

राज ठाकरे दिल्लीला रवाना; युतीच्या चर्चेला बळकटी
राज ठाकरे दिल्लीला रवाना; युतीच्या चर्चेला बळकटी

Raj Thackeray in Delhi : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राही त्यास अपवाद नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजपशी गुप्तगू सुरू असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजपशी युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठीच त्यांचा हा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जात आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी विरुद्ध भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळं या दोन्ही आघाड्यांकडून छोट्या पक्षांना आपल्याकडं खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळंच मनसेलाही सोबत घ्यावं असा एक प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. गेल्या काही दिवसांत भाजप आणि मनसे नेत्यांची या संदर्भात पडद्यामागे चर्चाही सुरू होती. ती चर्चा निर्णायक वळणावर आल्याचं आजच्या घटनेतून स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित ठाकरे व अन्य काही नेते त्यांच्यासोबत असल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत आहेत. तिथं राज ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. मनसेला महायुतीत घेण्याविषयी ही चर्चा असल्याचं बोललं जातं.

मनसेला सोबत घेतल्यास लोकसभेच्या एक ते दोन जागा त्यांच्यासाठी सोडाव्या लागणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार शहरांत मनसेची दखल घेण्याइतपत ताकद आहे. ही ताकद सोबत आल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देता येईल अशी भाजपची रणनीती आहे.

मनसेला कोणत्या जागा?

मनसे भाजपसोबत आल्यास दक्षिण मुंबईची जागा त्यांना सोडण्याबाबत विचार सुरू आहे. दक्षिण मुंबईत सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. या मतदारसंघात मराठी मतं लक्षणीय असून ठाकरेंच्या शिवसेनेचा इथं वरचष्मा आहे. इथं शिवसेनेला मात द्यायची असल्यास मनसेचा उमेदवार उपयुक्त ठरेल असाही एक होरा आहे. त्याशिवाय आणखी एखाद्या जागेचा आग्रह मनसेकडून धरला जाऊ शकतो, असंही बोललं जात आहे. लोकसभेला एकही जागा न घेता त्याऐवजी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये ताकदीनं लढायचं, असाही मनसेचा विचार असल्याचं बोललं जातं.

Whats_app_banner
विभाग