Vijay Shivtare vs Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांविरुद्ध विशेषत: अजित पवार यांच्या विरुद्ध उभे ठाकलेले माजी मंत्री विजय शिवतारे माघार घ्यायला तयार नाहीत. ‘विजय शिवतारे कोण आहे हे मी अजित पवारांना दाखवून देणार,’ असा निर्धार त्यांनी आज पुन्हा बोलून दाखवला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी शिवतारे यांना पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावली होती. तेव्हापासून दोघांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण सुरू आहे. पवार कुटुंबात फूट पडून दोन पवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यानं आता शिवतारे यांनी अजित पवारांचा राजकीय बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळंच ते अपक्ष म्हणून बारामती लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
अजित पवारांचा पक्ष हा सध्या भाजप व शिंदे गटासोबत महायुतीमध्ये आहे. शिवतारे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळं महायुतीमध्येही पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. दोनदा शिवतारे आणि मुख्यमंत्री शिेंदे यांची चर्चा झाली. मात्र, त्यातून ठोस काही निर्णय झाला नाही.
आज पत्रकारांशी बोलताना शिवतारे यांनी लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर अरेरावीचा आरोप केला. विजय शिवतारे कोण आहे? तुझा आवाका किती? तुझी लायकी किती? तू बोलतोयस कोणाबद्दल? असं अजित पवार म्हणाले होते. आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. माझा आवाका नाही तर आता अजित पवार घाबरतात कशाला? एवढी तडफड का सुरू आहे?,' असा सवाल शिवतारे यांनी केला.
पवारांना पाचही विधानसभा मतदारसंघांतील पाहिजे आणि सगळे प्रकल्प फक्त बारामतीत घेऊन जातात. खुद्द बारामतीमध्येही विकास नाही. आजही अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. त्यांनी बारामतीकरांबरोबरच इतर तालुक्यांनाही फसवलं आहे, असा आरोप शिवतारे यांनी केला.
‘मी जे बोललो की अजित पवार नालायक आणि उर्मट आहेत. तेच आता त्यांचे बंधू बोललेत. ही गोष्ट जगजाहीर आहे. अजित पवारांना एवढीच भीती आहे तर त्यांनी मला एखादा फोन केला असता. मी तुला भेटायला येतो किंवा तू मला भेटायला ये आपण चर्चा करू असं ते बोलू शकले असते. आता फोन आला तरी काही होणार नाही. आता उशीर झाला आहे,’ असंही शिवतारे म्हणाले.