मराठी बातम्या  /  elections  /  baramati lok sabha : विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम; प्रसंगी शिंदे गटातून बाहेर पडणार

baramati lok sabha : विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम; प्रसंगी शिंदे गटातून बाहेर पडणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 23, 2024 12:33 PM IST

Vijay Shivtare to contest Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रसंगी पक्ष सोडण्याची तयारी विजय शिवतारे यांनी दाखवली आहे.

विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम; प्रसंगी शिंदे गटातून बाहेर पडणार
विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम; प्रसंगी शिंदे गटातून बाहेर पडणार

Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवारांच्या विरोधात उभे ठाकलेले माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामतीतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघ आणि पवार कुटुंब हे राज्याच्या राजकारणातील अतूट समीकरण आहे. शरद पवार आणि त्यानंतर सुप्रिया सुळे हेच या मतदारसंघातून वर्षानुवर्षे निवडून येत आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडल्यानं पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटानं सुनेत्रा पवार यांना उतरवण्याची तयारी केली आहे. मात्र, अजित पवारांशी टोकाचं राजकीय वैर असलेले विजय शिवतारे यांनी शड्डू ठोकल्यानं या निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट आला आहे. शिवतारे यांनी पवार कुटुंबाविरुद्ध विशेषत: अजित पवारांविरुद्ध आघाडीच उघडली आहे. त्यामुळं महायुतीमधील सर्वच पक्षांची गोची झाली आहे.

आता माघार नाही!

शिवसेनेच्या शिंदे गटात असलेल्या शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते माघार घ्यायला तयार नाहीत. अजित पवारांना धडा शिकवणार आणि जनतेच्या अपमानाचा बदला घेणार असा निर्धारच त्यांनी केला आहे. मी आता खूप पुढं निघून गेलो आहे. ही निवडणूक आता लोकांनी मनावर घेतली आहे. त्यामुळं मी माघार घेऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंची अडचण होऊ देणार नाही!

शिवतारे हे शिंदेंच्या गटात असल्यामुळं महायुतीकडून त्यांच्यावर दबाव येत आहे. शिवतारे बारामतीमधून लढल्यास शिंदेंच्या उमेदवारांना मदत करणार नाही, असा पवित्रा शिंदे गटानं घेतला आहे. अगदी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातही असहकार पुकारण्याचा इशारा अजित पवार गटानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांना युतीचा धर्म पाळावा लागणार आहे. मला महायुतीतून अधिकृत तिकीट मिळावं अशी माझी इच्छा आहे. तसं न झाल्यास आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होत असल्यास मी बाहेर पडायला तयार आहे. आमचे संबंध खूप जुने आहेत, असं शिवतारे यांनी म्हटलं आहे.

भेटीगाठींचा सपाटा

शिवतारे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून बारामती मतदारसंघातील सर्व पवार विरोधकांच्या भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. विशेषत: अजित पवारांवर नाराज असलेल्या लोकांची भेट शिवतारे घेत आहेत. नुकतीच त्यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्यानंतर आज ते इंदापूरचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहेत.

WhatsApp channel