Govinda lok sabha election : प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गोविंदा यांना नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तो लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करेल, असंही बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानासाठी आता महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला असला तरी अनेक पक्षांना उमेदवार मिळालेले नाहीत. महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई ही जागा मिळणार आहे. तिथं ठाकरेंच्या शिवसेनेनं अमोल कीर्तीकर यांना रिंगणात उतरवलं आहे. अमोल कीर्तीकर हे शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळं गजानन कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यास पक्षातूनच विरोध आहे. त्यांनीही जवळपास निवडणुकीतून माघार घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर गोविंदाचं नाव पुढं आलं आहे.
गोविंदानं अलीकडंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या भेटीत त्यानं उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली असल्याचंही सांगितलं जातं. गोविंदासाठी निवडणूक नवीन नाही. काही वर्षांपूर्वी त्यानं उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदा अभिनय क्षेत्रातही चमकत होता. त्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यानं राम नाईक यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र, खासदार झाल्यानंतर तो फारसा संसदेकडं फिरकला नव्हता. कालांतरानं तो राजकारणातून बाजूला झाला.
आता पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा आहे. गोविंदा हा अमराठी असला तरी त्याचं लहानपण विरारमध्ये गेलं आहे. त्यामुळं तो अस्खलित मराठी बोलतो. सर्व भाषिकांना तो आपला वाटतो. त्याच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यताही नाही. काही दिवसांपूर्वीच त्यानं रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेतली होती. त्यामुळं तो निवडणूक लढविण्याबाबत गंभीर असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे त्याला कसा प्रतिसाद देतात याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेकडं तुल्यबळ उमेदवार नसल्यानं उत्तर पश्चिम मुंबई हा मतदारसंघ भाजप आपल्याकडं ठेवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास गोविंदाला भाजपमधूनही संधी मिळू शकते. काही वर्षांपूर्वी याच मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे संजय निरुपम हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यांनी अलीकडंच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. हा मतदारसंघ भाजपकडं गेल्यास ते भाजपमध्ये जाऊन इथून रिंगणात उतरू शकतात अशीही एक चर्चा आहे.