udayanraje news : साताऱ्यात वेगळाच पेच! अजित पवारांच्या पक्षाकडून लढण्यास उदयनराजेंचा नकार, फडणवीसांशी चर्चा
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  udayanraje news : साताऱ्यात वेगळाच पेच! अजित पवारांच्या पक्षाकडून लढण्यास उदयनराजेंचा नकार, फडणवीसांशी चर्चा

udayanraje news : साताऱ्यात वेगळाच पेच! अजित पवारांच्या पक्षाकडून लढण्यास उदयनराजेंचा नकार, फडणवीसांशी चर्चा

Updated Mar 21, 2024 12:22 PM IST

Udayanraje bhoslae news : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले भाजपकडूनच लढण्यावर ठाम असल्यानं पेच निर्माण झाला आहे.

साताऱ्यात वेगळाच पेच! अजित पवारांच्या पक्षाकडून लढण्यास उदयनराजेंचा नकार, फडणवीसांशी चर्चा
साताऱ्यात वेगळाच पेच! अजित पवारांच्या पक्षाकडून लढण्यास उदयनराजेंचा नकार, फडणवीसांशी चर्चा

Satara Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे. सातारा लोकसभेच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आहे. उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्याची तयारीही दर्शवली आहे. मात्र, उदयनराजे यांनी घड्याळाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढण्याची भूमिका घेतल्याचं समजतं.

शिवसेना व भाजपची महायुती असताना सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडं होता. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडं होता. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांना पराभवाची धूळ चारली होती. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता दोन्ही पक्षांच्या नव्या गटांनी या जागेवर दावा केला आहे. मात्र, हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटण्याची शक्यता मावळली आहे.

साताऱ्यात सध्या शिवेंद्रराजे हे भाजपचे आमदार आहेत. तर, उदयनराजे हे राज्यसभेवर खासदार आहेत. छत्रपतींच्या घराण्यातून असल्यामुळं या दोन्ही नावांभोवती वलय आहे. उदयनराजे हे अनेकदा वेगवेगळ्या पक्षांकडून इथून उमेदवार असतात. यावेळी देखील उदयनराजे हे लढण्यास इच्छुक आहेत. महायुतीनं हा मतदारसंघ अजित पवारांच्या पक्षाला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तिथून उदयनराजे यांनी लढावं असा महायुतीचा आग्रह आहे. मात्र, ते कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवू इच्छित आहेत.

शिवेंद्रराजे भोसले यांचीही अशीच भूमिका आहे. साताऱ्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळं भाजपनंच ही लोकसभेची जागा लढवावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी नुकतीच साताऱ्यात जाऊन उदयनराजे व शिवेंद्रराजे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता उदयनराजे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. या भेटीत नेमकं काय होतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुरुषोत्तम जाधव यांचाही दावा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही सातारा लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. ही जागा शिवसेनेचीच आहे. प्रत्येक वेळी आम्ही इतरांसाठी त्याग केला आहे. अपक्ष लढूनही मी इथं यापूर्वी २ लाखांच्या वर मतं घेतली आहेत. सातारा हा मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं जिल्ह्यात अनेक विकासकामं झाली आहेत. पक्षाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळं ही जागा आम्हालाच मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या