Sonia Gandhi PC: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप-systematic efforts underway by pm to cripple congress financially sonia gandhi ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sonia Gandhi PC: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

Sonia Gandhi PC: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

Mar 21, 2024 03:32 PM IST

Sonia Gandhi allegations on PM Modi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

Sonia Gandhi allegations on PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज प्रथमच पत्रकार परिषदेला संबोधित केलं. सोनिया गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला. काँग्रेस पक्षाला आर्थिकदृष्ट्या पंगू करण्याचा पद्धतशीर प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत,' असं सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया गांधी यांच्या सोबत यावेळी राहुल गांधीमल्लिकार्जुन खर्गे हे देखील होते. इन्कम टॅक्स विभागानं काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाची काही खाती गोठवली होती. वारंवार मागणी करूनही ही खाती खुली करण्यात येत नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. याच मुद्द्यावर आज सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली.

'आम्ही जो मुद्दा उपस्थित करत आहोत, तो अत्यंत गंभीर आहे. हा मुद्दा केवळ काँग्रेसपुरता मर्यादित नाही, तर देशातील लोकशाहीवर घातक परिणाम करणारा आहे. काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा पंतप्रधानांकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे, असं त्या म्हणाल्या.

‘एकीकडं इलेक्टोरल बाँडचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयानं ही योजनाच घटनाबाह्य ठरवली आहे. या योजनेतून भाजपला प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. दुसरीकडं प्रमुख विरोधी पक्षाच्या आर्थिक स्त्रोतांवर घाला घातला जात आहे. लोकांनी स्वेच्छेनं आम्हाला दिलेला पैसा गोठवला जात आहे. बळजबरीनं तो ताब्यात घेतला जात आहे. हे सगळं लोकशाही विरोधी आहे. देशात असं कधीही झालं नव्हतं. अशा परिस्थितीतही आम्ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतोय,' असं सोनिया गांधी म्हणाल्या.

समान संधी नाकारली जातेय!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील यावेळी मोदी सरकारवर हल्ला चढवला. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षानं हजारो कोटी रुपये घेतले असताना विरोधी पक्षाची खाती गोठवली जात आहे. काँग्रेसला निवडणूक लढताच येऊ नये याची तजवीज केली जातेय. समान संधी नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. या देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांना समान संधी मिळणं आवश्यक आहे, असं खर्गे म्हणाले.

सत्य लवकरच समोर येईल!

भाजप प्रणित सरकार विविध पळवाटा शोधून पैसे गोळा करत आहे. त्यांच्या पक्षाकडं पंचतारांकित कार्यालयं आहेत. प्रत्येक सभेसाठी विमानांचा वापर केला जात आहे, असा दावा खर्गे यांनी केला. भाजपनं काही कंपन्यांकडून पैसे कसे घेतले याबद्दल मी आताच काही बोलणार नाही. सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Whats_app_banner