sharad pawar news : केजरीवालांना अटक करून भाजपनं मोठं संकट ओढवून घेतलंय; काय म्हणाले शरद पवार?-sharad pawar reaction on arvind kejriwal arrest said bjp will have pay the price ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sharad pawar news : केजरीवालांना अटक करून भाजपनं मोठं संकट ओढवून घेतलंय; काय म्हणाले शरद पवार?

sharad pawar news : केजरीवालांना अटक करून भाजपनं मोठं संकट ओढवून घेतलंय; काय म्हणाले शरद पवार?

Mar 22, 2024 12:43 PM IST

Sharad pawar on Arvind Kejriwal arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे.

केजरीवालांना अटक करून भाजपनं संकट ओढवून घेतलंय; काय म्हणाले शरद पवार?
केजरीवालांना अटक करून भाजपनं संकट ओढवून घेतलंय; काय म्हणाले शरद पवार? (PTI)

Sharad pawar on Arvind Kejriwal arrest : 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीनं केलेली अटकेची कारवाई चुकीची आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरू आहे. केजरीवालांना अटक करून भाजपनं संकट ओढवून घेतलंय. आम्ही मोठ्या ताकदीनं अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहू. याची किंमत भाजपला आणि केंद्र सरकारला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज दिला.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 'निवडणुकीच्या काळात भाजपकडून भीती पसरवण्याचं काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्यांतील प्रमुख नेत्यांविरोधात ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जातेय. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे, त्यांना तुरुगांत टाकलं जातंय, असं पवार म्हणाले.

आणीबाणीतही जे झालं नाही, ते आता होतंय!

'ईडी, सीबीआयचा वापर करणं, निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार आहे. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळंच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असा दावा पवारांनी केला.

निवडणूक कशी होईल याविषयी चिंता

‘आतापर्यंत देशात काही अपवाद सोडले तर निवडणुका या अतिशय मोकळ्या वातावरणात झाल्या आहेत. मात्र यावेळेसची निवडणूक कशी होईल याची शंका आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरू आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसची बँक खाती गोठवल्याने त्यांची प्रचार यंत्रणा थांबली आहे. याआधी दिल्लीतील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली, त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे, ही चिंतेची गोष्ट आहे, असं ते म्हणाले.

भाजपला दिल्लीत एकही जागा मिळणार नाही!

'मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर कारवाई करून भाजपनं स्वतःवर मोठं संकट ओढावून घेतलं आहे. यामुळं केजरीवाल यांनाच मोठं मताधिक्य मिळणार आहे. मागच्या वेळी विधानसभेत भाजपाल ७० पैकी तीन जागांवर विजय मिळवता आला होता, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तितक्याही जागा त्यांना मिळणार नाही. पण केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या १०० टक्के जागा निवडून येतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.