मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Swara Bhaskar : स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये जाणार? मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार

Swara Bhaskar : स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये जाणार? मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 22, 2024 06:25 PM IST

Swara Bhaskar Will Join Congress : अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून गोविंदा विरोधात मुंबईतील उत्तर-मध्य मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरू शकते.

स्वरा भास्कर मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार
स्वरा भास्कर मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार

बॉलीवूड अभिनेता गोंविदा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर तो लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदाला मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याला शह देण्यासाठी काँग्रसने नवी चाल खेळत या मतदारसंघात बॉलीवूड अभिनेत्रीला उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून गोविंदा विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडूनअद्याप जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आलेले नाही. काही जागांवरून मविआतील घटक पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र तरीही आपआपल्या परीने उमेदवार जाहीर केले जात आहे. काँग्रेसने गुरुवारी राज्यातील सात मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाकरे गटाकडूनही अनेक जागांवर उमेदवार जाहीर केले जात आहेत. सुत्रांनुसार काँग्रेसला मुंबईतील एक जागा मिळू शकते. या जागेवरविविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड भाष्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला मैदानात उतरवलं जाऊ शकते. या मतदारसंघासाठी स्वरा भास्कर तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांच्याही नावाचा विचार सुरु आहे.

मुंबईतील सहापैकी अधिकाधिक जागांवर महाविकास आघाडीमधील घटकपक्ष ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेसला मुंबईतील केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा आहे. या जागेवर स्वरा भास्कर किंवा राज बब्बर यांना संधी मिळू शकते. दरम्यान स्वरा भास्करने दिल्लीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतल्याने ती लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघातील तरुण मतदारांचा विचार करता स्वरा भास्करच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात सध्या भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत. यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र जर ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेली तर येथे अभिनेता गोविंदाला मैदानात उतरवले जाऊ शकते. यामुळे या मतदारसंघात पूनम महाजन विरुद्ध स्वरा भास्कर किंवा गोविंदा विरुद्ध स्वरा भास्कर अशी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

 

अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक सामाजिक व राजकीय मुद्यावर आपले परखड मत मांडले आहे. अनेकदा तिने भाजप विरोधात भूमिका मांडून आंदोलनातही उतरली आहे. भाजपच्या सीएए आणि एनआरसीच्या कायद्यांविरोधात ती आंदोलन करताना दिसली होती. त्याचबरोबर ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही सामील झाली होती.

WhatsApp channel