काँग्रेसकडून राज्यातील ७ उमेदवारांची यादी जाहीर; कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, पुण्यातून धंगेकर, सोलापुरातून प्रणिती तर..
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  काँग्रेसकडून राज्यातील ७ उमेदवारांची यादी जाहीर; कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, पुण्यातून धंगेकर, सोलापुरातून प्रणिती तर..

काँग्रेसकडून राज्यातील ७ उमेदवारांची यादी जाहीर; कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, पुण्यातून धंगेकर, सोलापुरातून प्रणिती तर..

Published Mar 21, 2024 10:58 PM IST

Congress Candidate List : महाविकास आघाडीमधील जागावाटप अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नसताना काँग्रेसने आपल्याकडे येणाऱ्या सात संभाव्य मतदारसंघात उमेदवार केले आहेत.

काँग्रेसकडून राज्यातील ७ उमेदवारांची यादी जाहीर
काँग्रेसकडून राज्यातील ७ उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसने राज्यातील सात मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमधील जागावाटप अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नसताना काँग्रेसने आपल्याकडे येणाऱ्या संभाव्य मतदारसंघात उमेदवार केले आहेत. काँग्रेसने आज देशभरातील ५८ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली त्यात महाराष्ट्रामधील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूरमधून अपेक्षेप्रमाणे शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने सात उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये नंदूरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर, आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसचे आज उमेदवारी केलेल्या ७ लोकसभा मतदारसंघांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील चार मतदारसंघ हे आरक्षित आहेत.यामध्ये काँग्रेसने नंदूरबारमधून जी. के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी अटीतटीची लढत होणार आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ८ मार्च रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. या यादीत राहुल गांधी, शशी शरूर यांच्यासह ३९ उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांचा समावेश होता. आता काँग्रेस आपली तिसरी यादी जाहीर केली असून यामध्ये ५७ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल पार पडली होती. त्याआधी दोन दिवस संभाव्य उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करण्यात आले. काँग्रेसच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. मात्र, तिसऱ्या यादीत ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

नांदेड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेले वसंतराव चव्हाण हे नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. चव्हाण शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. २०२२ मध्ये राष्ट्रवादीकडून ते विधान परिषदेवर गेले होते. मात्र २००९ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी न दिल्याने ते बंडखोर म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या