मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 21, 2024 09:46 PM IST

Uddhav Thackeray : सांगलीवरून महाविकास आघाडीचं घोडं अडलं असताना आता उद्धव ठाकरेंनी थेट उमेदवारच जाहीर करून काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहारची उमेदवारी केली जाहीर
उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहारची उमेदवारी केली जाहीर

महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. मात्र काही ठराविक मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. त्यात सांगलीचा समावेश आहे. कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगली मतदारसंघावर दावा ठोकला आहे. मात्र सांगली मतदारसंघ आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने काँग्रेस त्याबाबत आग्रही आहे. सांगलीवरून महाविकास आघाडीचं घोडं अडलं असताना आता उद्धव ठाकरेंनी थेट उमेदवारच जाहीर करून काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.

या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठामधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करत सांगलीकरांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे करत जो मातीत लढतो, मातीत जिंकतो तो कधीही मातीशी गद्दारी करत नाही.

मिरज शहरात झालेल्या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी येथे चंद्रहारची उमेदवारीच जाहीर करायला आलो. ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडून येऊन दिल्लीत जातील. हा मर्द तुमच्यासाठी मैदानात उतरला आहे. याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. चंद्रहार पाटील जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा त्यांनी मला एक गदा भेट दिली. ती गदा मी घरी ठेवली आहे. मात्र मी चंद्रहार यांना सांगतो की, ही समोर दिसतेय ती तुमची खरी गदा आहे. जोपर्यंत ही गदा तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण आहे, याची चिंता करू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या धर्माचा अनादर करणं शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही. ते जे म्हणतात ते हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे, तर भाजपचे हिंदुत्व घरं पेटवणारं आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव म्हणाले, दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा,  दुसऱ्याची घरे फोडायची वर सरळ सांगायचं बघा मी दोन घरं फोडून श्रीमंत झालो. अरे दुसऱ्याचे पैसे, संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती नागोबा सारखा बसतोस, तू कसला रे मर्द? तू कसला राजकारणी? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.

IPL_Entry_Point