Sanjay Raut on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी प्रचार-अपप्रचाराचा धुरळा जोरात उडू लागला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena UBT) भाजपसोबत येणार असल्याच्या चर्चाही होऊ लागल्या आहेत. त्यामुळं उलटसुलट तर्कवितर्क सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसैनिकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपच ही चर्चा घडवून आणत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
‘भारतीय जनता पक्षानं आयटी सेल, पोर्ट्ल आणि वेबसाइटच्या टोळ्या निर्माण केल्या आहेत. हे सडक्या मेंदूचे लोक आहेत. जेव्हा पराभव स्पष्ट दिसतो, तेव्हा अशाप्रकारचा गोंधळ निर्माण करायचा. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा त्यांचा उद्योग असतो. एक शिवसेना त्यांनी घेतली आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या दावणीला बांधली आहे. मग भाजपला मूळ शिवसेना कशासाठी हवी आहे,' असा रोकडा सवाल राऊत यांनी केला आहे.
'भाजपनं सगळे चोर मंडळ बाजूला घेऊन त्यांच्या तोंडाला पट्ट्या चिटकवल्या आहेत. आता त्यांनी त्यांच्यासोबत सुखानं नांदावं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कोणत्याही चोर मंडळांमध्ये सहभागी होणार नाही, असं राऊत यांनी ठणकावलं आहे.
'मी उद्धव ठाकरे यांना अधिक चांगला ओळखतो. उद्धव ठाकरे हे अत्यंत स्वाभिमानी नेतृत्व आहे. ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली, ज्यांनी मराठी माणसासाठी निर्माण झालेल्या शिवसेनेचा घात केला, अशा व्यापारी लोकांबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याइतके आम्ही नतद्रष्ट आणि स्वाभिमानशून्य नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.
राज्य सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी अलीकडंच या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. त्यांना भाजपसोबत जायचं आहे, असं केसरकर म्हणाले होते. केसरकरांच्या या विधानामुळं ही चर्चा सुरू झाली होती. त्या चर्चेला आज राऊत यांनी पूर्णविराम दिला.
ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांच्या सभांमधून ते मोदी-शहांवर जोरदार तोफा डागत आहेत. शहा हे शेपूटघाले गृहमंत्री आहेत अशी टीका कालच त्यांनी लातूरच्या औसा येथील सभेत केली. शिवसैनिकांच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये हाच उद्धव यांच्या आक्रमकतेमागचा हेतू असल्याचं बोललं जात आहे.