Lok Sabha Election 2024 : ‘अमित शहा हे शेपूटघाले गृहमंत्री आहेत. मणिपूर, काश्मीर आणि अरुणाचलमध्ये शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढतात,’ अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी शहांवर केली आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी प्रमुख पक्षांनी आतापासूनच वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशातील वेगवेगळ्या राज्यांत जाऊन कार्यकर्त्यांना आणि सभांना संबोधित करत आहेत. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर आता अमित शहा यांनीही नुकताच महाराष्ट्र दौरा केला. त्यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
शहा यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी औसा येथील सभेत उत्तर दिलं. 'इतर पक्षांप्रमाणे आमदार, खासदार फोडले तर शिवसेना संपेल असं भाजपला वाटत होतं. शिवसेना तशी संपणारी नाही. शिवसेना भाजपला संपवून, गाडून, मूठमाती देऊन पुढं जाईल, पण शिवसेना संपणार नाही, असं त्यांनी भाजपला ठणकावलं.
अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. ‘मणिपूर पेटलंय तिकडं जायची त्यांची हिंमत होत नाही. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसलंय, तिकडं जायची हिंमत नाही. महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढतायत. असे हे शेपूटघाले गृहमंत्री आहेत,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
'बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला निवडणूक जिंकण्यासाठी मोदींची अजिबात गरज नाही. महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालू शकत नाही हे भाजपला कळलंय. कारण सिक्का खोटा आहे. त्यामुळंच त्यांनी शिवसेना चोरली, फोडली आणि आता बाळासाहेबांचे फोटो लावून मत मागतायत. माझ्या वडिलांऐवजी स्वत:च्या वडिलांचे फोटो लावण्याची हिंमत दाखवा, असं आव्हानच उद्धव यांनी भाजप आणि शिंदेंना दिलं.
‘मोदी-शहांची रेकॉर्ड अडकलीय. त्यांच्याकडं सांगायला काहीच नाही. नेहरूंनी काय केलं, काँग्रेसनं काय केलं, काँग्रेसनं देश लुटला, हेच यांचं सुरू आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
‘सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा मोदींना निवडून द्या असं आता सांगितलं जातंय. २०४७ साली आपला देश जगातला सर्वात बलवान देश असेल असं सांगितलं जातंय. २०४७ तुम्ही तरी बघाल का? कशाला सांगताय त्या गप्पा. आता काय देता ते बोला. गरिबांच्या ताटात आज काय देता ते बोला,’ असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.