मराठी बातम्या  /  निवडणुका  /  AIMIM Lok Sabha : ओवेसी बिघडवणार 'इंडिया' आघाडीचं गणित; देशभर मोठ्या संख्येनं उतरवणार उमेदवार

AIMIM Lok Sabha : ओवेसी बिघडवणार 'इंडिया' आघाडीचं गणित; देशभर मोठ्या संख्येनं उतरवणार उमेदवार

Mar 07, 2024 06:01 PM IST

Lok Sabha Election 2024 : असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम (AIMIM) हा पक्ष देशभरात लोकसभा निवडणूक लढण्याच्या विचारात आहे. त्याचा थेट फटका इंडिया आघाडीला (India Alliance) बसणार आहे.

ओवेसी बिघडवणार 'इंडिया' आघाडीचं गणित; देशभर मोठ्या संख्येनं उतरवणार उमेदवार
ओवेसी बिघडवणार 'इंडिया' आघाडीचं गणित; देशभर मोठ्या संख्येनं उतरवणार उमेदवार

Lok Sabha Elections 2024 : केंद्रातील सत्ताधारी भाजपला व भाजप्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करणाऱ्या इंडिया आघाडीचं (India Alliance) टेन्शन असदुद्दीन ओवेसी यांनी वाढवलं आहे. ओवेसी यांचा एमआयएम (AIMIM) हा पक्ष उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील अनेक राज्यांत उमेदवार उतरवणार आहे. त्याचा थेट फटका इंडिया आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. सुरुवातीला मजबुतीनं वाटचाल करणाऱ्या या आघाडीला नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांच्या रूपानं धक्का बसला होता. त्या धक्क्यातून इंडिया आघाडी सावरत नाही तोच आता ओवेसी यांनी देशभरात उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात मुरादाबाद, रामपूर, संभल, बरेलीसह जवळपास २० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यात बहुतेक जागा पश्चिम उत्तर प्रदेश, रोहिलखंड आणि पूर्वांचलमधील असतील. याशिवाय बिहारमध्ये ७ जागांवर एमआयएम चाचपणी करत आहे. याआधीच्या निवडणुकीतही ओवेसी यांनी इथून उमेदवार उतरवले होते.

इंडिया आघाडीची बरीचशी मदार मुस्लिम मतांवर आहे. ओवेसी यांचा पक्षच मुस्लिम चेहरा असलेला आहे. त्यामुळं ओवेसी यांनी उमेदवार उतरवल्यास इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो.

महाराष्ट्रातही उमेदवार देणार

महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार उभे राहू शकतात. २०१९ च्या निवडणुकीतही एमआयएमनं महाराष्ट्रात उमेदवार दिले होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत एमआयएमची आघाडी होती. एमआयएमनं या निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवत छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती. त्यामुळं तिथून एमआयएमचा उमेदवार निश्चित आहे. त्याशिवाय मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा लढण्याचा एमआयएमचा विचार आहे.

ममता बॅनर्जी यांना दिलासा

ओवेसी यांचा पक्ष बहुतेक राज्यांत निवडणूक लढणार असला तरी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढण्याचा निर्णय पक्षानं घेतल्याचं समजतं. त्यामुळं ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची थेट लढत हिंदुत्ववादी भाजपशी आहे. त्याशिवाय काँग्रेस व डाव्या पक्षांशी त्यांची आघाडी झालेली नाही. त्यामुळं आधीच मताचं विभाजन होणार आहे. एमआयएमचा उमेदवार असता तर आणखी फाटाफूट झाली असती. मात्र, एमआयएमनं माघार घेतल्यामुळं ती टळणार आहे.

WhatsApp channel