मराठी बातम्या  /  elections  /  Sanjay Raut news : आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे; संजय राऊत यांचा आंबेडकरांना सल्ला

Sanjay Raut news : आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे; संजय राऊत यांचा आंबेडकरांना सल्ला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 07, 2024 02:45 PM IST

Sanjay Raut advice to Prakash Ambedkar : महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागावाटपात आग्रही भूमिका घेणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे; संजय राऊत यांचा आंबेडकरांना सल्ला
आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे; संजय राऊत यांचा आंबेडकरांना सल्ला

Sanjay Raut advice to Prakash Ambedkar : ‘आघाडीच्या राजकारणात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आघाडी धर्म टिकवणं गरजेचं आहे. आपल्याच मनाप्रमाणं होईल हा हट्ट सोडला पाहिजे. तो काँग्रेसनं सोडलेला आहे. राष्ट्रवादीनं सोडलेला आहे आणि शिवसेनेनंही सोडलेला आहे,’ असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मविआच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपांसाठी प्रमुख नेत्यांची बैठक काल मुंबईत झाली. प्रकाश आंबेडकर हे देखील तिथं उपस्थित होते. बैठकीनंतर चर्चा सकारात्मक झाली असं आंबेडकर म्हणाले. मात्र, काही वेळातच मनासारखं झालं नाही असं मत त्यांच्या पक्षाकडून मांडण्यात आलं. यावर राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली.

'आघाड्यांमध्ये सगळंच आपल्या मनासारखं होत नाही. आम्ही भाजपसोबत युतीत असतानाही आमच्या मनासारखं झालं नाही. आता महाविकास आघाडीत आहोत. आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे गोष्टी होण्याचा हट्ट सोडला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

‘प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची उत्तम चर्चा झाली आहे. नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही राजवट घालवण्याची प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे. आमचीही तीच भूमिका आहे. काही जागांच्या संदर्भात पुढं चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात आम्हाला वेगळं चित्र निर्माण करायचं आहे. त्यामुळं काल काहीच घडलं नाही असं सांगणं योग्य नाही. वंचितच्या बाबतीत काल चर्चा खूप पुढं गेली आहे. त्यांचं पूर्ण समाधान करण्याचं आम्ही ठरवलं आहे,' असं राऊत म्हणाले.

आंबेडकर मायावतींप्रमाणे भाजपला मदत करणार नाहीत!

‘प्रकाश आंबेडकरांनी एक प्रस्ताव दिला आहे. त्यावर कालच्या बैठकीत चर्चा झाली. आता ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीत पुन्हा त्यावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुन्हा आमची चर्चा होईल. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल असं कोणतंही पाऊल प्रकाश आंबेडकर उचलणार नाहीत. उत्तर प्रदेशात मायावती जे करत आहेत, त्याला प्रकाश आंबेडकरांचा पूर्ण विरोध आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

WhatsApp channel