लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे १५ दिवस शिल्लक असल्यानं आता उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. महायुतीमध्ये पाच जागांच्या वाटपाचा तिढा कायम असताना महाविकास आघाडीनं आपले उमेदवार घोषित करणं सुरूच ठेवलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं काल चार उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं आज आणखी दोन उमेदवार जाहीर केले. याआधी शरद पवारांनी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. आज दोन नावांच्या घोषणेनंतर आता पक्षाचे एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कापून भाजपनं यावेळी पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळं मराठवाड्यातील वातावरण काहीसं वेगळं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनं इथं अधिकची ताकद लावली आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं आहे. या जागेसाठी शिवसंग्रामचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे व अलीकडंच पवारांसोबत आलेले बजरंग सोनवणे यांच्यात चुरस होती. मात्र, शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षातील फुटीनंतर सोनवणे हे अजित पवारांसोबत होते. ते अजित पवार व धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जायचे. मात्र, जिल्हाध्यक्ष पद काढून घेतल्यापासून ते नाराज होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी पवारांच्या पक्षात प्रवेश केला. तेव्हाच त्यांना बीडमधून उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. तो अंदाज खरा ठरला आहे. २०१९ मध्ये त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवून मोठ्या प्रमाणात मतं मिळवली होती.
काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये भिवंडीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. मात्र, शरद पवारांनी हा मतदारसंघ राखला असून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बाळ्यामामा याच नावानं परिचित असलेले सुरेश म्हात्रे यांचं ठाणे ग्रामीणमध्ये मोठं प्रस्थ आहे. मूळचे शिवसैनिक असलेले बाळ्यामामा अनेक पक्ष फिरून अलीकडंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत.
भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या बाळ्यामामा यांनी २०१४ मध्ये मनसेच्या तिकिटावर भिवंडीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. कालांतरानं त्यांनी भाजप व नंतर शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, कपिल पाटील यांच्याशी मतभेद कायम होते. २०१९ साली कपिल पाटील यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध करत बंडखोरी केली होती. मात्र नंतर अर्ज मागे घेतला. नंतर अनेक पक्षांतून शेवटी त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांना आता इथून संधी मिळाली आहे. ते कपिल पाटील यांना कशी टक्कर देतात याबाबत उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या