Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास अवघे १५ दिवस असतानाही राज्यातील प्रमुख पक्षांचं जागावाटप पूर्ण झालेलं नाही. तर, काही जागांचं वाटप होऊनही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. हे सगळं सुरू असतानाच जाहीर केलेला उमेदवार मागे घेण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आली आहे. हिंगोली लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. तर, यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार भावना गवळी यांचाही पत्ता कट झाला आहे.
हिंगोलीमध्ये शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीरही केली होती. मात्र, भाजपचे स्थानिक आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाटील यांच्या उमेदवारीस कडाडून विरोध केला होता. त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, विरोध कायम राहिल्यानं अखेर शिंदेंना उमेदवार मागे घ्यावा लागला आहे. हेमंत पाटील यांच्या ऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ईडीच्या रडारवर असलेल्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे गटात उडी मारली होती. त्यामुळं त्यांच्या विरोधातील तपास यंत्रणांची कारवाई थांबली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजपनं सुरुवातीपासूनच विरोध केला होता. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी अद्याप इथला उमेदवार जाहीर केला नव्हता. मात्र, आता हिंगोलीतून तिकीट कापलेल्या हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं भावना गवळी यांचा पत्ता कापला गेला आहे.
शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आले होते. या सगळ्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी शिंदे यांनी घेतली होती. मात्र, आता त्यापैकी चार खासदारांचा पत्ताच कट झाला आहे. त्यात हेमंत पाटील, भावना गवळी, गजानन कीर्तीकर आणि कृपाल तुमाने यांचा समावेश आहे. भाजपच्या नाराजीमुळं कृपाल तुमाने यांना रामटेकमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर, गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं शिंदे यांना तिथं दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात नाशिक, सातारा, ठाणे व कल्याण लोकसभेच्या जागांवरून भाजप, शिंदे व अजित पवारांमध्ये मतभेद आहेत. नाशिक व साताऱ्याच्या जागेवर तिन्ही पक्षांचा दावा आहे. तर, ठाणे व कल्याणवरून भाजप व शिंदेंच्या सेनेत संघर्ष सुरू आहे.
संबंधित बातम्या