मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Karan Pawar : उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनं भुवया उंचावल्या! कोण आहेत जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार?

Karan Pawar : उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनं भुवया उंचावल्या! कोण आहेत जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 03, 2024 06:51 PM IST

Jalgaon Lok Sabha Candidate Karan Pawar : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी आज करण पवार यांच्या नावाची घोषणा केली.

या नावानं सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं! कोण आहेत जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार?
या नावानं सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं! कोण आहेत जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार?

Shiv Sena UBT : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आज आणखी ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचाही यात समावेश होता. इथून करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर करण पवार यांच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

करण पवार यांनी भाजपचे जळगावचे (Jalgaon Lok Sabha Election) विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंकडून उन्मेष पाटील हे उमेदवार असतील असा अंदाज होता. मात्र, ठाकरेंनी अनपेक्षितरित्या करण पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी सगळे काहीसे आश्चर्यचकीत झाले.

कोण आहेत करण पवार?

करण पवार यांना राज्य पातळीवर ओळख नाही. जळगाव-धुळे पट्ट्यात मात्र ते लोकप्रिय आहेत. पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत. त्यामुळं राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. सतीश पाटील हे करण पवार यांचे काका आहेत.

करण पवार हे पारोळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू समजले जातात. मराठा समाजातील तरुण चेहरा अशी ओळख असलेले करण पवार यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. भाजपचे पारोळा-एरंडोलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. भाजप व इतर पक्षातील त्यांच्या संबंधांचा आणि संपर्काचा लोकसभा निवडणुकीत त्यांना फायदा होईल असं मानलं जात आहे.

कोणाशी होणार करण पवार यांची लढत?

भाजप प्रणित महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी करण पवार यांची थेट लढत होणार आहे. भाजपनं उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून रावेर भाजपमध्ये मोठा वाद सुरू आहे. हा वाद सुरू असतानाच आता करण पवार रिंगणात उतरल्यानं भाजपसमोर आणखी एक आव्हान उभं ठाकलं आहे. भाजप नेते गिरीश महाजन या सगळ्याला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जळगावात इतिहास घडेल - करण पवार

जळगाव लोकसभेतील परिस्थिती पाहून आणि उन्मेष पाटील यांच्या शिफारशीनुसार उद्धव ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपला शिवसेनेची ताकद मिळत होती. त्यामुळं भाजपला इथं मताधिक्य मिळत होतं. मात्र, आम्ही महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. या मतदारसंघात यावेळी इतिहास घडेल, असा विश्वास आहे.

WhatsApp channel