Shiv Sena UBT : मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे आणखी ४ उमेदवार जाहीर, कल्याणचा शिलेदारही ठरला!-shiv sena ubt chief uddhav thackeray declares remaining candidates vaishali darekar to contest from kalyan ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Shiv Sena UBT : मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे आणखी ४ उमेदवार जाहीर, कल्याणचा शिलेदारही ठरला!

Shiv Sena UBT : मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे आणखी ४ उमेदवार जाहीर, कल्याणचा शिलेदारही ठरला!

Apr 03, 2024 04:54 PM IST

Shiv Sena UBT Lok Sabha Candidates : ठाकरेंच्या शिवसेनेनं आज आणखी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी ४ उमेदवार जाहीर, कल्याणमध्ये उमेदवारी कोणाला?
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी ४ उमेदवार जाहीर, कल्याणमध्ये उमेदवारी कोणाला?

Shiv Sena UBT Candidate : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आज आणखी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वैशाली दरेकर यांची लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे.

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली. त्यात कल्याण, पालघर, जळगाव आणि हातकणंगले मतदारसंघांचा समावेश आहे.

हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींना पाठिंबा नाहीच!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल असं बोललं जात होतं. मविआमध्ये ही जागा शिवसेनेकडं आहे. त्यामुळं शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. ठाकरे यांनी शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याची विनंती केली होती. मात्र, शेट्टी यांनी त्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेनं तिथं माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबईतील दोन जागा काँग्रेसकडं

उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघ हे काँग्रेसनं लढवावेत, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. काँग्रेसनं हे मतदारसंघ लढवल्यास शिवसेना पूर्ण ताकदीनिशी काम करेल. त्यांची तयारी नसल्यास शिवसेना इथून लढण्यास तयार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

उन्मेष पाटील आले, पण उमेदवारी दुसऱ्याला

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आजच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं त्यांनाच इथून उमेदवारी मिळेल असा एक अंदाज होता. मात्र, त्यांच्याऐवजी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे. करण पवार हे उन्मेष पाटील यांचे खंदे समर्थक आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेले उमेदवार

पालघर - भारती कामडी (Bharati Kamadi)

कल्याण - वैशाली दरेकर-राणे (Vaishali Darekar-Rane)

जळगाव - करण पवार (Karan Pawar)

हातकणंगले - सत्यजित (आबा) पाटील (Satyajit Patil)