Unmesh Patil joins Shiv Sena UBT : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाला जळगावमध्ये मोठा हादरा बसला आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात त्यांचं स्वागत केलं.
उन्मेष पाटील हे जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. २०१९ साली तब्बल ४ लाखांहून अधिक मताधिक्यानं ते निवडून आले होते. मात्र, यावेळी पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळं उन्मेष पाटील नाराज होते. या नाराजीतून त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. कालच त्यांनी खासदार संजय राऊत व नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आणि आज त्यांनी शिवबंधन बांधलं.
'उन्मेष पाटील आणि माझी व्यथा एकच आहे. उन्मेष पाटील यांनी भाजप वाढवण्यासाठी जसे कष्ट घेतले, तसेच कष्ट अनेक शिवसैनिकांनी घेतले. पण वापर करून फेकण्याची भाजपची नीती आहे. त्या नीतीला विरोध करण्याचं धाडस उन्मेष यांनी दाखवलं. एका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात पुरात उडी मारली. सत्ता असते तिथं लोक जातात, पण उन्मेष पाटील हे जनतेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेसोबत आले आहेत. ज्यांनी आपली फसगत केली, त्यांना पुन्हा निवडून येऊ द्यायचं नाही. शिवछत्रपतींचा अस्सल भगवा आता जळगावातून लोकसभेवर पाठवायचा आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
'कोणत्याही उमेदवारीसाठी किंवा पदाच्या लालसेपोटी मी शिवसेनेत आलेलो नाही. अवहेलनेला कंटाळलो होतो. भाजप-शिवसेनेच्या युतीत मी निवडून आलो होतो. मागील निवडणुकांमध्ये माझ्या विजयात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. एका भावानं दगा दिला असला तरी दुसऱ्या भावानं साथ दिली आहे. आता ही मशाल हाती घेतली आहे. क्रांतीची ही मशाल जळगावसह उत्तर महाराष्ट्रात नेऊ. क्रांतीचा विचार सर्वत्र रुजवू, असा शब्द उन्मेष पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला.
उन्मेष पाटील यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडं आहे. त्यामुळं उन्मेष पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.