Lok Sabha Election 2024: भाजपकडून भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने त्यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली असून राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ यांच्याकडून अद्यापही राजश्री पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही भावना गवळी यांना उमेदवारी मिळावी म्हणून खिंड लढू, असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार यांनी स्पष्ट केले.
भाजपला गवळींच्या उमेदवारीबाबत कोणताही आक्षेप नव्हता. भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यामागे पक्षातील काही नेत्यांचा हात आहे. भाजपने सर्वेक्षण अहवालाचा आधार घेत गवळींना उमेदवारी नाकारली आहे. मग, कोणत्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी राजश्री पाटील यांना उमेदवारी घोषित केली, असा सवाल गवळी यांचे समर्थक नितीन बांगर यांनी उपस्थित केला. भावना गवळी यांनी पाचवेळा खासदारकी जिंकली आहे. त्या अपराजित खासदार आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मताधिक्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप गवळी यांच्या समर्थकांनी केला आहे.
"सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो, मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदार संघातून निवडून येऊ शकते. मी अजूनही मतदारसंघावरील दावेदारी सोडलेली नाही.मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे", असा इशारा भावना गवळी यांनी दिला. यानंतर भावना गवळी या राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून अर्ज भरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, भावना गवळी यांच्यासह कृपाल तुमाने आणि हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
"शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो?" अशी पोस्ट विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर केली आहे.